असद शेख, अकबर पठाण व नईम शेख यांची महाराष्ट्र संघात निवड लातूर (प्रतिनिधी) – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत महाराष्ट्र बॉल बॅडमिंटन असोसिएशन व अमरावती जिल्हा बॉल बॅडमिंटन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती येथे दि. 4 ते 7 सप्टेंबर 2026 दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या 70व्या महाराष्ट्र स्टेट बॉल बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2026-27 स्पर्धेत लातूर जिल्हा संघाने दमदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावून महाराष्ट्र चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळविला. या राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्रातील तब्बल 33 जिल्ह्यांच्या संघांनी सहभाग नोंदविला होता. लातूर जिल्हा संघाने स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच आपला दबदबा कायम ठेवत गोंदिया, अमरावती महानगर, अहिल्यानगर, सिंधुदुर्ग, धुळे, मुंबई, अकोला, ठाणे व वर्धा या संघांवर मात केली. उपांत्य फेरीत पुणे ग्रामीण संघासोबत झालेल्या अटीतटीच्या सामन्यात लातूरने 2-1 असा थरारक विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात लातूर जिल्हा संघाने पुणे महानगर संघाविरुद्ध सुरुवातीपासूनच आक्रमक व नियोजनबद्ध खेळाचे प्रदर्शन करत सरळ दोन सेटमध्ये एकतर्फी विजय मिळविला आणि दिमाखात सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. गेम चेंजर्सच्या आक्रमक खेळीने लातूर ठरला चॅम्पियन लातूरच्या या ऐतिहासिक विजयात संघातील खेळाडूंच्या उत्कृष्ट समन्वयासोबतच त्यांच्या वैयक्तिक कौशल्याचीही निर्णायक भूमिका राहिली. बेस्ट शूटर अकबर पठाण, राष्ट्रीय खेळाडू नईम शेख, नेट चेकर व राष्ट्रीय खेळाडू अदनान शेख, अपकमिंग स्टार व बेस्ट फ्रंट ड्रॉपर फैजान शेख तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडू व पोलीस दलात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले असद शेख यांच्या गेम चेंजिंग खेळीमुळे लातूर संघाने प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजविले. लातूर जिल्हा संघात रितेश घोटमुकले, अर्शद शेख, प्रथमेश पाटील, आमेर शेख व सईद यांचा समावेश होता. संघाला आयुब जागीरदार, विकास जायभाये, प्रशांत सुरनर व साक्षी रोकडे यांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन लाभले. mलातूरच्या या शानदार कामगिरीनंतर जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. नईम शेख (स्टार ऑफ इंडिया), अकबर पठाण (इंडिया बेस्ट प्लेअर) आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू असद शेख यांची दि. 24 ते 28 सप्टेंबर 2026 दरम्यान श्रीकालहस्ती, आंध्र प्रदेश येथे होणाऱ्या 72व्या ऑल इंडिया नॅशनल बॉल बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2026-27 स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे.ही निवड राज्यसचिव अतुल इंगळे, उपाध्यक्ष ऋषिकेश पापडकर, सहसचिव विजय पळसकर, निवड समिती अध्यक्ष डॉ. हरीश काळे, निवड समिती सदस्या मनीषा खापरे व सरिता ठावकर यांनी जाहीर केली. लातूर जिल्हा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून खेळाडूंचा सत्कार राज्यस्तरीय स्पर्धेतील नेत्रदीपक विजय तसेच राष्ट्रीय स्पर्धेसाठी झालेल्या निवडीबद्दल लातूर जिल्हा बॉल बॅडमिंटन संघटनेतर्फे खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. जिल्हाध्यक्ष धनंजय कोत्तावार, उपाध्यक्ष ज्ञानोबा भोसले, सहसचिव विजय जगताप, सुनील शिंदे, मेहराज सर, तबरेज शेख व मनीषा सूर्यवंशी यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 35 वर्षांची गौरवशाली परंपरा लातूर जिल्हा मागील 35 वर्षांपासून बॉल बॅडमिंटन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असून अनेक दिग्गज पदाधिकारी व खेळाडूंनी जिल्ह्याचे नाव राज्य व राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे. तत्कालीन जिल्हा सचिव नानासाहेब माने, अध्यक्ष अड. हेमंत पाटील, राजाभाऊ शेळके, व्यंकटराव गुणाले, कादर मामू, प्रदीप जाधव, गुलाबराव माने, शिवकुमार सोनटक्के, चांद मामू, माशाळकर साहेब, माकने सर, रवी सरदेशमुख, विजय कुंटे, राजेश सोनकांबळे, बुजारे दादा, जगरूप कराड व अॅड. जगदीश मद्रे यांसारख्या मान्यवरांचे योगदान लातूरच्या बॉल बॅडमिंटनच्या वाटचालीत मोलाचे ठरले आहे. असद शेख यांच्या मार्गदर्शनातून अनेक खेळाडूंचे करिअर घडले लातूर जिल्ह्यात बॉल बॅडमिंटनच्या प्रसार-प्रचारासाठी तसेच खेळाडूंना सातत्याने मार्गदर्शन करून त्यांना मोफत क्रीडा साहित्य व आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देत अनेक खेळाडूंचे करिअर घडविण्याचे मोलाचे कार्य जिल्हा सचिव, प्रशिक्षक व आंतरराष्ट्रीय खेळाडू असद शेख यांनी केले आहे. त्यांच्या या योगदानामुळे लातूर जिल्ह्यातील अनेक गुणवान खेळाडूंना राज्य व राष्ट्रीय स्तरावर आपली प्रतिभा सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे. सन 2008 पासून जिल्हा संघटनेचे सचिव व प्रशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या असद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्ह्यातील खेळाडूंनी विविध राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकांची कमाई केली आहे. या यशस्वी वाटचालीत राम लिंबाळे, तानाजी कदम, मारुती सगरे, संगमेश्वर लाटे, गोविंद काळे, हसन शेख, पप्पू माने, मनोज दहातोंडे, सुनील शिंदे, अकबर पठाण, नईम शेख, अदनान शेख, हर्षद शेख, फैजान शेख, विकास जायभाये, प्रशांत सुरनर, अरहान शेख, अनिस पिंजारी, खब्बू शेख, किरण पौळ, अनुसया पाटील, मनीषा माने, स्वाती औसेकर, उर्मिला, स्वाती फड, कोमल पौळ, कल्पना पौळ, उज्वला कांबळे, विद्या अंभुरे, पूजा राठोड, मनीषा सूर्यवंशी, नीता बानाटे, पृथ्वी यादव, भूमीका, वैष्णवी, प्रनिता,कांचन,रोहिणी, नंदिनी, राधा,दिपाली, साक्षी रोकडे व शुभांगी जाधव यांसह अनेक खेळाडूंचे योगदान राहिले आहे. लातूरच्या बॉल बॅडमिंटनच्या या सातत्यपूर्ण यशामुळे जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात पुन्हा एकदा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, राज्य विजेतेपदासह आता राष्ट्रीय स्पर्धेतही महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे लातूरचे खेळाडू देशपातळीवर आपल्या खेळाचा ठसा उमटविण्यास सज्ज झाले आहेत. Post Views: 74 Facebook WhatsApp Twitter LinkedIn Post navigation प्रोजेक्ट महादेवाच्या युवा फुटबॉलपटूंना ब्राझीलचे विश्वविजेते कर्णधार काफू यांच्याकडून कौतुकाची थाप