मुंबई – मैदानावरील दमदार कामगिरी आणि त्यानंतर जागतिक फुटबॉलमधील दिग्गजाकडून मिळालेली कौतुकाची थाप अशा दुहेरी आनंदाचे क्षण ‘प्रोजेक्ट महादेवा’च्या युवा फुटबॉलपटूंनी अनुभवले. आगामी आय-लीग तसेच इतर स्पर्धात्मक सामन्यांच्या तयारीच्या दृष्टीने खेळविण्यात आलेल्या मैत्रीपूर्ण सामन्यांमध्ये प्रोजेक्ट महादेवाच्या मुला-मुलींनी आपली गुणवत्ता सिद्ध केली. मुंबईतील कूपरेज फुटबॉल मैदानावर झालेल्या सामन्यात प्रोजेक्ट महादेवाच्या मुलांच्या संघाने मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन स्तरावरील विजेत्या डॉन बॉस्को, माटुंगा यांच्या १४ वर्षांखालील संघावर ५–० असा दणदणीत विजय मिळवला. तर मुलींच्या संघाने महाराष्ट्र राज्यस्तरीय १५ वर्षांखालील WIFA विजेत्या संघाविरुद्ध १–१ अशी बरोबरी साधत उत्कृष्ट लढत दिली. या सामन्यांमध्ये खेळाडूंनी दाखवलेले तांत्रिक कौशल्य, सांघिक खेळ, शिस्त, आत्मविश्वास आणि स्पर्धात्मक वृत्ती हे सातत्यपूर्ण प्रशिक्षण आणि विशेष शिबिरांमधून झालेल्या त्यांच्या प्रगतीचे द्योतक ठरले. विश्वविजेत्या काफूंकडून कौतुक आणि प्रेरणा या युवा खेळाडूंच्या प्रवासात आणखी एक अविस्मरणीय क्षण जोडला गेला. प्रोजेक्ट महादेवाच्या खेळाडूंना ब्राझीलचे महान फुटबॉलपटू आणि फिफा विश्वचषक विजेत्या ब्राझील संघाचे कर्णधार काफू यांची भेट घेण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची विशेष संधी मिळाली. काफू यांनी या युवा खेळाडूंच्या प्रयत्नांचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहित केले. तसेच खेळाडूंना त्यांच्या हस्ते विशेष ‘Letter of Appreciation’ प्रदान करण्यात आले. जागतिक फुटबॉलमधील एका महान खेळाडूकडून मिळालेली ही कौतुकाची थाप मुलांसाठी प्रेरणादायी ठरली. यावेळी खासदार तथा WIFA अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, सुप्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख आणि भारताचे दिग्गज क्रिकेटपटू हरभजन सिंह उपस्थित होते. त्यांनीही युवा फुटबॉलपटूंशी संवाद साधत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. Kanthak Suryatal Post Views: 594 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा 33 जिल्ह्यांना मागे टाकत लातूर ठरला महाराष्ट्राचा बादशहा ! 70व्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत लातूरचा गोल्डन गेम !