नांदेड जिल्हा कारागृहात विविध गुन्हेगारी टोळ्यांचे प्रमुख व त्यांचे साथीदार एकाच ठिकाणी बंदिस्त असल्याने त्यांच्यातील परस्पर संपर्कातून कारागृहातील अंतर्गत सुरक्षिततेला तसेच कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या माध्यमातून कारागृह व सुधारसेवा महासंचालनालयाकडे विशेष प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार गृह विभाग व कारागृह प्रशासनाच्या परवानगीने सात सराईत गुन्हेगारांचे स्थलांतर करण्यात आले.या कारवाईत कैलास जगदीश बिगानिया, अनिल ऊर्फ पंजाबी सुरेश पवार, साईसिंग गहेरवार, ईश्वरसिंग जयवंतसिंग गीरणीवाले, सुरेंद्रसिंग ऊर्फ सूरज जगतसिंग गाडीवाले, आशु पाटील आणि मिर्झा शब्बरबेग मिर्झा गफार बेग यांचा समावेश असल्याचे पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
टोळ्यांचे कारागृहातील जाळे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न
कारागृहात टोळीतील प्रमुख आणि साथीदार एकत्र राहिल्यामुळे त्यांच्यातील संपर्क कायम राहण्याची शक्यता होती. त्यामुळे गुन्हेगारी टोळ्यांचे कारागृहातील जाळे सक्रिय होऊ नये आणि कारागृहातील शिस्त व सुरक्षितता अबाधित राहावी, या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली आहे. नांदेड शहरात दहशत निर्माण करणाऱ्या तसेच संघटित पद्धतीने गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या टोळ्यांविरोधात यापुढेही कठोर कायदेशीर कारवाई सुरूच ठेवण्यात येईल, असा स्पष्ट इशारा नांदेड पोलिसांनी दिला आहे.
