जुन्या नांदेडमध्ये वीज गायब; रात्री साडेबारा वाजता उजेड परतला, तोपर्यंत मिरवणूकच संपली! नांदेड (प्रतिनिधी) – एकीकडे दुर्गामातेचा जयघोष, ढोल-ताशांचा गजर आणि भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचलेला असताना, दुसरीकडे जुन्या नांदेडमधील जुना मोंढा ते नावघाट नदीकिनारा परिसरात अंधाराने आपले साम्राज्य निर्माण केले. दुर्गा विसर्जनासारख्या संवेदनशील आणि गर्दीच्या प्रसंगी वीज गायब होणे, हा केवळ तांत्रिक बिघाड नसून संबंधित यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे करणारा प्रकार आहे. विशेष म्हणजे, रात्री सुमारे साडेबारा वाजता वीज पूर्ववत झाल्याचे नागरिक सांगतात. तोपर्यंत विसर्जन मिरवणूकही संपली होती. मग प्रश्न असा की, मिरवणूक संपल्यानंतर आलेल्या विजेने नेमका कोणता दिवा लावला? दुर्गा विसर्जन मिरवणुकीत हजारो नागरिक सहभागी होतात. अशा वेळी गर्दीवर नियंत्रण ठेवणे, अनुचित प्रकार रोखणे आणि नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करणे ही पोलिसांची महत्त्वाची जबाबदारी असते. मात्र, त्यासाठी आवश्यक असलेला उजेडच गायब असेल, तर पोलिसांनी अंधारातच कायदा-सुव्यवस्थेचा दिवा पेटवायचा का? एकीकडे संभाव्य अनुचित घटनांवर लक्ष ठेवायचे आणि दुसरीकडे अंधारात घडलेल्या प्रकारांचा तपास करायचा, असा दुहेरी भार पोलिसांवर टाकणे कितपत योग्य आहे? मग वीज वितरण कंपनीची जबाबदारी नेमकी कुठे संपते? मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांच्या मार्गावर वीजपुरवठा खंडित झाल्यास तातडीने पर्यायी व्यवस्था उभी करण्याची तयारी असायला नको का? आवश्यक ठिकाणी जनरेटर, तात्पुरती प्रकाशव्यवस्था किंवा त्वरित दुरुस्तीची यंत्रणा सज्ज ठेवणे ही खबरदारी अशा प्रसंगी अत्यावश्यक ठरते. कारण गर्दीत एखादी छोटीशी घटना घडली, तर तिचे गंभीर स्वरूप धारण करण्यास वेळ लागत नाही. आता अंधारात काही घडलेच असेल, तर सीसीटीव्ही फुटेज तपासा आणि नंतर कारवाई करा, एवढाच उपाय उरतो. पण प्रश्न असा आहे की, घटना घडल्यानंतर फुटेज तपासण्यापेक्षा घटना घडूच नये यासाठी प्रकाशव्यवस्था का केली नाही? वीज नसल्याने सीसीटीव्ही फुटेज सुद्धा रेकॉर्ड झाले नसणार. पोलिसांनीही वीज वितरण कंपनीकडे याबाबत जाब विचारण्याची गरज आहे. सण-उत्सवांच्या वेळी बंदोबस्त पोलिसांनी करायचा, गर्दी पोलिसांनी सांभाळायची, संभाव्य धोके पोलिसांनी ओळखायचे आणि वीजपुरवठा बंद पडल्यावर अंधारातही पोलिसांनीच परिस्थिती हाताळायची! मग संबंधित वीज वितरण यंत्रणेने नेमके करायचे काय? जुन्या नांदेडमधील या प्रकाराची चौकशी करून जबाबदारी निश्चित होणार का, की पुन्हा एकदा अंधार पडेल आणि जबाबदारीही अंधारातच हरवून जाईल? नागरिकांना केवळ आश्वासनांचा उजेड नको; प्रत्यक्षात सुरक्षिततेचा प्रकाश हवा आहे. Kanthak Suryatal Post Views: 477 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation झोप उडवणारा महाघोटाळा! भाजपशासित मध्य प्रदेशात २५० कोटींची लूट उघड; सरकारी अधिकाऱ्यांचा कचरा गाडी ते बल्ब दरोडा! ५ हजारांची लाच स्वीकारणारा तलाठी जेरबंद