
५ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त; डीआयजी शहाजी उमाप यांच्या पथकाची धडक कारवाई
नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस पथकाने लातूर व हिंगोली जिल्ह्यांत धडक कारवाई केली. या कारवाईत मटका व्यवसायावर कारवाई करत ११ जणांना ताब्यात घेण्यात आले, तर हिंगोली जिल्ह्यात गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला. दोन्ही कारवायांत एकूण १३ आरोपींविरुद्ध कारवाई करून तब्बल ५ लाख ४६ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
लातूर जिल्ह्यातील गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत १९ ऑगस्ट रोजी दोन मटका बुकींवर छापा टाकण्यात आला. या कारवाईत ५२ हजार ७७० रुपयांची रोकड, १ लाख ७ हजार रुपयांचे ९ मोबाईल, ३० हजार रुपयांचे २ टॅबलेट तसेच २ लाख १३ हजार ५०० रुपयांचे संगणक साहित्य, असा एकूण ४ लाख ३ हजार २७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी ११ जणांना ताब्यात घेऊन गांधी चौक पोलीस ठाण्यात गुरनं. ५८५/२०२६ व ५८६/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२(अ) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, २० ऑगस्ट रोजी हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनखळी गावात माणिक यशवंतराव गारकर यांच्या घरात साठवून ठेवलेला १ लाख ४२ हजार ७८० रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. या प्रकरणी माणिक यशवंतराव गारकर व संजय बाळासाहेब गारकर, रा. अनखळी, ता. औंढा, जि. हिंगोली यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या दोन्ही कारवायांत एकूण १३ आरोपींकडून रोकड, ११ मोबाईल, टॅबलेट, संगणक साहित्य आणि गुटखा असा ५ लाख ४६ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्यासह पोहेकॉ. प्रदीप खानसोळे, पोहेकॉ. गणेश राठोड, पोहेकॉ. संदीप वाघाडे व पोहेकॉ. गजानन डवरे यांच्या पथकाने केली. पथकाच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले.
अवैध व्यवसायांची माहिती खबर हेल्पलाइनवर द्या
अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांपर्यंत पोहोचविण्यासाठी नांदेड परिक्षेत्र पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाने खबर हेल्पलाइन सुरू केली आहे. नागरिकांनी आपल्या परिसरातील अवैध व्यवसायांची माहिती ९१५१००१००१ या मोबाईल क्रमांकावर देऊन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.
