सीबीआयची धाड की बातमीचा फुगवटा?  नांदेडमध्ये पत्रकारितेचा मिरची मसाला जरा जास्तच तिखट!बदनामीचा जबाबदार कोण ?

नांदेड (प्रतिनिधी)- पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतात. पण हा स्तंभ कधी कधी इतका डुलायला लागतो की, उंटावरून शेळ्या हाकणाऱ्या काही मंडळींना सत्य आणि सनसनाटी यातला फरकच उरत नाही. अन्यायाविरोधात आवाज उठवणे, प्रशासनाने दाबून ठेवलेल्या गोष्टी जनतेसमोर आणणे हे पत्रकारांचे पवित्र कर्तव्य आहे. पण नाक कापून दुसऱ्याला अपशकून करण्याचा परवाना पत्रकारितेला कोणी दिलेला नाही. नांदेडमध्ये घडलेल्या एका प्रकाराने पुन्हा एकदा हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

गौतम अडाणी यांच्या एनडीटीव्ही मराठी या वृत्तवाहिनीवर काल एक धडाकेबाज बातमी झळकली सीबीआय पथकाकडून कोनाळे क्लासेसची झाडाझडती. बातमी अशी रंगवण्यात आली की जणू नांदेडमध्ये एखादा मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस आला आहे. देशभर चर्चेत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणाशी संबंध जोडून सीबीआय नांदेडमध्ये दाखल झाली, कोनाळे क्लासेसवर धाड टाकली, चौकशी केली आणि नंतर पथक लातूरकडे रवाना झाले अशी कथा रंगवण्यात आली.

 

पण खरी गंमत पुढेच आहे. डोंगर पोखरला आणि उंदीर निघाला ही म्हण जणू या बातमीसाठीच बनली असावी. कारण प्रत्यक्षात ना सीबीआय आली होती, ना धाड पडली होती, ना झाडाझडती झाली होती! म्हणजेच बातमीचा सगळाच फुगा हवेत उडालेला. सत्याचा पत्ता नाही आणि सनसनाटीचा फवारा मात्र भरपूर! जेव्हा ही बातमी खोटी असल्याचे समजले, तेव्हा ती शांतपणे डिलीट करण्यात आली. पण प्रश्न असा आहे की, बातमी डिलीट केली म्हणजे बदनामीही डिलीट होते का? सोशल मीडियाच्या युगात एकदा बाण सुटला की परत येत नाही हे पत्रकारांनी विसरू नये. कोनाळे कुटुंब आणि त्या क्लासेसची झालेली मानसिक, सामाजिक आणि व्यावसायिक हानी कोण भरून काढणार?

सूत्रांच्या माहितीनुसार, कोनाळे कुटुंबात लवकरच एक मोठे शुभकार्य होणार आहे. अशा वेळी घरावर सीबीआयची धाड पडल्याची बातमी लोकांच्या कानावर गेल्यावर काय चर्चा झाली असेल, याची कल्पना न केलेलीच बरी. जिथं धूर उठतो तिथं आग असतेच अशी मानसिकता समाजात आजही आहे. मग कित्येकांच्या मनात संशयाचे बीज पेरले गेले असेल ना? आणि हा संशय निर्माण करण्याचा अधिकार पत्रकारांना कोणी दिला? नांदेडमधील एनडीटीव्ही मराठीचे पत्रकार योगेश लाठकर हे अत्यंत हुशार, विद्वान,व्यावसायिक आणि अनुभवी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे चुकून झाली ही सबब इथे फारशी पचनी पडत नाही. कारण सामान्य माणूस चुकतो तेव्हा त्याला शिक्षा मिळते, मग पत्रकार चुकला तर त्याच्यासाठी वेगळे नियम का? की मोठ्या घरचं कुत्रं चावलं तरी ते प्रेमच अशी परिस्थिती आहे?

चर्चा अशीही आहे की, वृत्तवाहिनीवर काही कारवाई होण्याची शक्यता कमीच. कारण शेवटी ती मोठ्या उद्योगसमूहाची वाहिनी आहे. ज्याचं जळतं त्यालाच कळतं हे खरं असलं तरी सामान्य नागरिकांच्या अब्रूची किंमत मोठ्या संस्थांना कितपत कळते, हा प्रश्न आहेच. पण निदान संबंधित पत्रकाराला तरी या प्रकरणाबाबत जाब विचारला जावा, एवढी अपेक्षा चुकीची नाही. पत्रकारितेच्या क्षेत्रात पहिले प्रसिद्ध करा, मग पडताळा करा ही नवीन परंपरा सुरू झाली आहे की काय अशी शंका यावी, इतकी स्पर्धा वाढली आहे. ब्रेकिंग न्यूजच्या नादात अनेक जण अति तिथे माती हे विसरत आहेत. टीआरपीच्या हव्यासापायी कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त होत असेल, तर ती पत्रकारिता नसून सार्वजनिक तमाशा ठरतो.

प्रसिद्ध गीतकार जगदीश खेबुडकर यांनी एकदा आमच्या दररोजचे नोट्स घेण्याच्या वहीवर लिहिले होते
पत्रकाराची लेखणी दुधारी, लागू नये कोणाच्या जिव्हारी.
आज ही ओळ पुन्हा पुन्हा आठवते. कारण लेखणीची धार सत्यासाठी असावी, बदनामीसाठी नव्हे.

हो, हेही खरं आहे की बातमी लिहिताना थोडा मिरची-मसाला लावावा लागतो. पण भाजी चविष्ट करण्यासाठी टाकलेली मिरची जर घरच जाळू लागली, तर त्याला स्वयंपाक म्हणत नाहीत. पत्रकारांनी शब्दांची ताकद ओळखायला हवी. कारण एखादी चुकीची ओळ कोणाच्या प्रतिष्ठेचा गळफास ठरू शकते.

आज प्रश्न फक्त कोनाळे क्लासेसचा नाही. प्रश्न आहे पत्रकारितेच्या विश्वासार्हतेचा. कारण लोकांनी जर बातम्यांवरचा विश्वास गमावला, तर मेंढपाळ आला रे आला या गोष्टीसारखी अवस्था होईल. खऱ्या वेळी सत्य सांगितले तरी लोक त्यावर विश्वास ठेवणार नाहीत.

म्हणूनच या प्रकरणातून धडा घेण्याची गरज आहे. बातमी देताना वेग महत्त्वाचा असतो, पण सत्य त्याहून महत्त्वाचं असतं. अन्यथा उद्या कुणाच्याही दारात खोटी धाड पडू शकते आणि समाज फक्त तमाशा पाहत राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!