एलपीजीच्या तुलनेत 10 ते 15 टक्के बचत;24 तास अखंडित सुरक्षित गॅस पुरवठा मिळणार
नांदेड – जिल्ह्यातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी असून नांदेड शहरात लवकरच घरगुती पीएनजी गॅस पुरवठा सुरू होणार आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या निर्देशानुसार पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाने (PNGRB) अधिकृत केलेल्या महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL-गेल आणि बीपीसीएलचा संयुक्त उपक्रम) कंपनीमार्फत सिटीगॅस वितरण (CGD) प्रकल्पांतर्गत पाईप्ड नॅचरल गॅस (PNG) नेटवर्क उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे.
पहिल्या टप्प्यात नांदेड शहरातील फरांदेनगर, तिरुमलानगर, छत्रपती चौक, कॅनॉल रोड, डीमार्ट परिसर, तरोडा खुर्द, कौठा आणि रवीनगर या भागात सुमारे 15 किलोमीटर लांबीची एमडीपीई गॅस पाईपलाईन टाकण्यात येत आहे. या माध्यमातून सुमारे 4 हजार घरांना थेट पाइपलाइनद्वारे गॅस जोडणी देण्यात येणार आहे.
पीएनजी गॅसचे मुख्य फायदे व वैशिष्ट्ये
• खर्चात बचत : पीएनजी गॅस सध्याच्या एलपीजी सिलिंडरच्या तुलनेत सुमारे 10 ते 15 टक्के स्वस्त असून सर्वसामान्यांच्या घरगुती खर्चात बचत होणार आहे.
• किचन पर्यंतच्या इन्फ्रास्ट्रक्चरचा खर्च मोफत : ग्राहकांच्या घराच्या, किचनच्या बाहेरील भिंतीपर्यंत गॅस पाईपलाईन व आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याचा संपूर्ण खर्च MNGL कंपनी करणार असून, ग्राहकांकडून यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
• 24 तास अखंडित पुरवठा: पाईपलाईनद्वारे 24 तास अविरत व सुरळीत गॅस पुरवठा सुरू राहणार असल्याने सिलिंडर संपण्याची भीती किंवा सिलिंडर बुकिंग व डिलिव्हरीची वाट पाहण्याची गरज उरणार नाही.
• अत्यंत सुरक्षितः पीएनजी हा नैसर्गिक वायू वायुरूपात (Gaseous form) पुरवला जातो त्यामुळे तो घरगुती एलपीजी सिलिंडरपेक्षा अधिक सुरक्षित आहे.
• पर्यावरणपूरक (Green Fuel) : हा गॅस पूर्णपणे पर्यावरणपूरक, धूरमुक्त आणि प्रदूषणरहित आहे.
नांदेड शहरामध्ये ज्या भागांत पाईपलाईनचे काम सुरू आहे. तेथील नागरिकांनी सुरक्षित, स्वस्त आणि अखंडित गॅस पुरवठ्यासाठी पुढे येऊन या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
