खुरगावचे श्रामणेर प्रशिक्षण केंद्र देशसेवेचे काम करेल- सुजात आंबेडकर

नांदेड- श्रामणेर प्रशिक्षण केंद्र हे नैतिक मूल्ये, करुणा, अहिंसा आणि अनुशासन शिकवून तरुण पिढीमध्ये राष्ट्रीय व सामाजिक भावना निर्माण करते. हे केंद्र बौद्ध संस्कृतीच्या प्रसारासोबतच समाजात सलोखा, शांतता आणि सुसंस्कार रुजवून एक आदर्श नागरिक घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे श्रामणेर प्रशिक्षण केंद्र देशसेवेचे काम करेल असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू सुजात आंबेडकर यांनी केले. यावेळी श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे संचालक तथा अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष भदंत पंय्याबोधी थेरो, भिख्खू संघासह अक्षय बनसोडे, ॲड अविनाश भोसीकर, शंकर महाजन, विनायक गजभारे, सिद्धार्थ थोरात, इंजि. भरत कानिंदे, प्रा. साहेबराव इंगोले, प्रा विनायक लोणे, अप्पाराव नरवाडे, सत्वशीला सिद्धार्थ थोरात, प्रफुलता विलास वाठोरे आदींची उपस्थिती होती. 
 
      तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रास सुजात आंबेडकर यांनी भेट दिली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत आंबेडकर यांच्या हस्ते बोधीवृक्षाचे रोपण करण्यात आले. यातून पर्यावरण संवर्धनासोबतच धम्म आणि निसर्ग यांच्यातील अतूट नाते जपण्याचा संदेश देण्यात आला. देशभरातील बौद्ध उपासक उपासकांसाठी विहार उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांनी पंय्याबोधी यांचे अभिनंदन केले. या पवित्र स्थळी उभारण्यात आलेले हे कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.  या ऐतिहासिक भूमीत उभारण्यात येत असलेली श्रामणेर दीक्षाभूमी भविष्यात धम्म, समता, बंधुता आणि सामाजिक परिवर्तनचे देशव्यापी केंद्र म्हणून विकसित होईल. देशातील विविध भागातील भिक्षू येथे प्रशिक्षण घेऊन धम्माच्या प्रसारासाठी कार्यरत होतील, अशी अपेक्षाही मान्यवरांच्या मनोगतांतून व्यक्त झाली. सर्व महापुरुषांच्या विचारधारेतून प्रेरणा घेऊन समतावादी आणि मानवतावादी विचारांतून समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करणे हीच खरी समाजसेवा ठरेल असे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!