दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलिस कर्मचारी अवधूत अंबादासराव काळे यांनी याबाबतचा अहवाल सादर केला. नांदेड ग्रामीण पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत विष्णुपुरी नवीन पुलाजवळ अवैधरीत्या रेतीची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस उपविभागीय अधिकारी प्रशांत शिंदे सोबत पोलीस अंमलदार पांचाळ,गौस,सरबजितसिंघ पुसरी,पवार यांनी कारवाईची तयारी केली.
पोलीस पथकाने पंचांसह पहाटे सुमारे ५ वाजता विष्णुपुरी नवीन पुलाच्या परिसरात पाहणी केली. त्यावेळी रेतीने भरलेली वाहने संशयास्पदरीत्या येताना आढळून आली. त्या गाड्यांचे क्रमांक एमएच ०६ एजी ९९२७, एमएच २१ बीएच ३०२७ आणि एमएच ०४ एफ जे ३९६० असे तीन टेम्पो थांबवले. त्यात एकएक ब्रास वाळू भरलेली होती. पोलिसांनी वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये परवानगीशिवाय रेतीची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्याचे अहवालात नमूद आहे.म्हणून गाड्यांचे चालक शेख आयुब शेख इस्माईल (३७) रा.सैलाब नगर नांदेड, दिनकर सीताराम धोंडगे (३६) रा. जुना कौठा नांदेड,किरण प्रल्हाद हनमंते (३४) रा. तेहरा नगर नांदेड यांना आणि पकडलेले तीन टेम्पो एकूण किंमत १२ लाख १५ हजारांचा मुद्देमाल नांदेड ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन केला आहे.
अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीमुळे शासनाचा महसूल बुडण्याबरोबरच पर्यावरणावरही परिणाम होतो. त्यामुळे अशा प्रकारच्या वाहतुकीविरोधात नांदेड ग्रामीण पोलिसांनी केलेली कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे.दरम्यान, जप्त करण्यात आलेल्या वाहनांची व रेतीची किंमत, संबंधित व्यक्तींविरुद्ध दाखल करण्यात येणाऱ्या गुन्ह्याचे स्वरूप तसेच पुढील कायदेशीर कारवाई याबाबतची प्रक्रिया सुरू असल्याचे अहवालातून स्पष्ट होते.
