आदिवासी शेतकऱ्यांना मूल्यवर्धनातून आर्थिक स्थैर्याचा नवा मार्ग
नांदेड- किनवट तालुक्यातील मौजे बोधडी (परिसर) येथे आदिवासी शेतकऱ्यांच्या शेवगा उत्पादनाला मूल्यवर्धनाची जोड देत उभारण्यात आलेल्या शेवगा प्रक्रिया युनिटचा भव्य उद्घाटन सोहळा सोमवार, 17 ऑगस्ट रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते या प्रक्रिया युनिटचे उद्घाटन करण्यात आले. वनश्री आदिवासी शेतकरी उत्पादक गट बोधडी बु. यांच्याकडे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनवट, कृषी विभाग तसेच अती प्रभावित मेगा पाणलोट प्रकल्प महाराष्ट्र (HIMWP-MH) यांच्या समन्वयातून हा नावीन्यपूर्ण उपक्रम साकारण्यात आला आहे. आदिवासी व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना केवळ शेती उत्पादनावर अवलंबून न ठेवता त्यांच्या उत्पादनावर प्रक्रिया, मूल्यवर्धन, पॅकिंग व बाजारपेठेची जोड देऊन उत्पन्नाचे शाश्वत स्रोत निर्माण करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून साकारला नावीन्यपूर्ण उपक्रम
शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शेतीमालाचे उत्पादन वाढविण्याबरोबरच त्यावर स्थानिक पातळीवर प्रक्रिया करून त्याची बाजारातील किंमत वाढविणे गरजेचे आहे. हीच संकल्पना केंद्रस्थानी ठेवून नांदेड जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनातून शेवगा प्रक्रिया युनिट उभारणीच्या उपक्रमाला चालना मिळाली. याच बरोबर 17 ऑगस्ट पासून सुरू असलेल्या 2 रेशीम प्रशिक्षण वर्ग मधील एकूण साधारण 60 रेशीम उत्पादक शेतकरी यांना कौशल्य विकास प्रशिक्षणाचा समारोप करण्यात आला व त्याप्रसंगी सर्व प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. HIMWP-MH प्रकल्पाच्या माध्यमातून शेती, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन, शेतकरी उत्पन्नवाढ आणि ग्रामीण उपजीविका बळकटीकरण यांना जोड देण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून शेवगा प्रक्रिया उद्योगाकडे पाहिले जात आहे. उद्घाटन सोहळ्यास डॉ. बी. सरवनन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी किनवट हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी कैलास जायभाये SBI RSETI संचालक नांदेड, डॉ. अशोक वडवळे जिल्हा रेशीम अधिकारी, विक्रांत देहानकर B.R.L.F. राज्य समन्वयक नागपूर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच तहसीलदार श्रीमती डॉ. शारदा चोंडेकर, बाबुराव सोनकांबळे एल.डी.एम. एस.बी.आय. नांदेड, श्रीमती जयश्री वाघमारे गटविकास अधिकारी पंचायत समिती किनवट, प्रदीप नाईक सहाय्यक प्रकल्प अधिकारी, चंद्रकांत निमोड तालुका कृषी अधिकारी किनवट, तुषार पाटील प्रकल्प संचालक RAES शाखा किनवट आदी मान्यवर उपस्थित होते.

