नांदेड (प्रतिनिधी) -सिडको भागातील रहिवासी इंदरजितसिंग बलजितसिंग बावरी (वय २५) यांच्या निर्घृण खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून, या प्रकरणी एका महिलेसह पाच जणांना ताब्यात घेण्यात आले होते. आज नांदेड ग्रामीण पोलिसांनी एका महिलेसह चार आरोपीना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मंगेश कायस्थ यांनी १६ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत पाठवले आहे.
घटनेचा तपशील: ही घटना ८ ऑगस्ट रोजी घडली. इंदरजितसिंग बावरी (रा. संत गाडगेबाबा सोसायटी, जुना कौठा) हे त्यांच्या चुलत भावासोबत फायनान्सच्या कामानिमित्त धनेगाव येथील पेट्रोल पंपावर गेले होते. त्यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या आरोपींनी जुन्या वादाचा सूड घेण्यासाठी इंदरजितसिंग यांच्यावर खंजराने वार केले, ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.

पोलिस कारवाई आणि अटक: तपासादरम्यान पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये दिलीप पुंडलिक डाकोरे (३३), कृष्णा दिगंबर बारोळे (२९), रणजीत ऊर्फ रंज्या चांदू सूर्यवंशी (२३), ज्योती जगदिश बिगानिया (४०) आणि एका विधिसंघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे.
न्यायालयीन प्रक्रिया: अटक करण्यात आलेल्या एका महिलेसह चार प्रौढ आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मंगेश कायस्थ यांच्यासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच, विधिसंघर्षग्रस्त बालकाला बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले असून, मंडळाने त्याला आपल्या अभिरक्षेत घेतले आहे. आरोपींना न्यायालयात हजर करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून न्यायालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या प्रकरणाचा पुढील तपास नांदेड ग्रामीण पोलीस करत आहेत.

