दि. ७ ऑगस्ट रोजी कंधार पोलिसांचे पथक गस्त घालत असताना गोपनीय माहिती मिळाली की, चिंचोली बायपास रोडवरून एका हायवामधून अवैधरीत्या रेतीची वाहतूक केली जात आहे. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन MH-26 BE-9198 क्रमांकाचा पिवळ्या रंगाचा टाटा कंपनीचा हायवा अडवून तपासणी केली. वाहनामध्ये पाच ब्रास रेती आढळून आली. वाहनचालकाकडे रेती वाहतुकीसाठी आवश्यक वैध परवाना व कागदपत्रे नसल्याचे तपासणीत निष्पन्न झाले.
पोलिसांनी हायवा किंमत सुमारे ४ लाख रुपये आणि पाच ब्रास रेती किंमत २५ हजार रुपये, असा एकूण ४ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी हायवा चालक भुजंग केशव शिंदे (वय २४), रा. रोहिपिंपळगाव, ता. मुदखेड, जि. नांदेड याच्याविरुद्ध कंधार पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३०३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली सुशील जुमडे, अरविंद घोडके, शंकर कामवाड व कंधार पोलिस ठाण्याच्या पथकाने केली. अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधातील कारवाई यापुढेही सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
