ऑपरेशन नार्कोस अंतर्गत आरपीएफच्या क्राइम इंटेलिजन्स ब्रांच (CIB-D&I), नांदेड व लोहमार्ग पोलीस (जीआरपी), नांदेड यांच्या संयुक्त पथकाने गाडी क्रमांक 20809 नागावली एक्सप्रेसमध्ये मुदखेड ते हजूर साहिब नांदेड स्थानकांदरम्यान विशेष अंमली पदार्थविरोधी तपासणी मोहीम राबवून दोन व्यक्तींना ताब्यात घेतले.
पंच, राजपत्रित अधिकारी, विधी मापनशास्त्र विभागाचे अधिकारी तसेच न्यायवैद्यकीय (फॉरेन्सिक) पथकाच्या उपस्थितीत करण्यात आलेल्या तपासणीत 10.736 किलोग्रॅम सुक्या गांजाची, अंदाजे ₹5.37 लाख किंमतीची जप्ती करण्यात आली. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध अंमली पदार्थ व मनःप्रभावी पदार्थ अधिनियम (NDPS Act) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
प्रवाशांना सुरक्षित प्रवासाचे वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी 06 ऑगस्ट 2026 रोजी ऑपरेशन यात्री सुरक्षा अंतर्गत आरपीएफ CIB-D&I, नांदेड व एलसीबी/जीआरपी, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त पथकाने छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर विशेष गस्त घातली. गाडी क्रमांक 17662 नागरसोल–काचेगुडा एक्सप्रेसच्या थांब्यादरम्यान प्रवाशांचे खिसे कापण्याचा प्रयत्न करणे, आरडाओरडा करणे व प्रवाशांशी गैरवर्तन करणे अशा प्रकारे संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका व्यक्तीस ताब्यात घेण्यात आले. संबंधित व्यक्तीस पुढील कारवाईसाठी लोहमार्ग पोलीस (जीआरपी), छत्रपती संभाजीनगर यांच्या ताब्यात देण्यात आले. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 110 व 117 अंतर्गत NCR क्रमांक 67/2026 नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
याशिवाय ऑपरेशन अमानत अंतर्गत आरपीएफने दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये प्रवाशांचा हरवलेला ऐवज शोधून त्यांना परत करून आपल्या प्रवासी सेवेप्रती असलेली बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली.
पहिल्या घटनेत रेल मदत (Rail Madad) तक्रारीवर तातडीने कार्यवाही करत आरपीएफ पोस्ट नगरसूल यांनी गाडी क्रमांक 12787 एक्सप्रेसमध्ये प्रवाशाने विसरून ठेवलेली महाविद्यालयीन बॅग शोधून काढली. या बॅगेमध्ये रोख रक्कम, कपडे, इअरबड्स, मोबाईल चार्जर, एटीएम कार्ड, ओळखपत्रे तसेच इतर वैयक्तिक साहित्य असा एकूण ₹7,500 किमतीचा ऐवज होता. आवश्यक पडताळणी पूर्ण केल्यानंतर हा ऐवज संबंधित प्रवाशाला सुरक्षितपणे परत करण्यात आला. प्रवाशाने आरपीएफच्या तत्पर व संवेदनशील सेवेसाठी मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
दुसऱ्या घटनेत श्रीमती माधवी, या आपल्या पतीसमवेत गाडी क्रमांक 17058 नांदेड–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेसने प्रवास करत असताना मनवत रोड रेल्वे स्थानकाजवळ त्यांचे सुमारे 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र, अंदाजे ₹1.40 लाख किंमतीचे, हरवले. ही माहिती मिळताच ट्रेन एस्कॉर्टिंग स्टाफने तातडीने संबंधित कर्मचाऱ्यांना कळविले. त्यानंतर आरपीएफ व जीआरपीच्या कर्मचाऱ्यांनी तत्परतेने शोधमोहीम राबवून हरवलेले मंगळसूत्र शोधून काढले. आवश्यक पडताळणीनंतर ते संबंधित प्रवाशाला सुपूर्द करण्यात आले. मौल्यवान ऐवज परत मिळाल्याने श्रीमती माधवी यांनी आरपीएफच्या तत्पर, समन्वित व प्रवासीहिताच्या कार्याबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली.
या सर्व यशस्वी कारवायांमधून रेल्वे सुरक्षा बलाची अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधातील कठोर भूमिका, गुन्हेगारांवर प्रभावी नियंत्रण, रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सातत्यपूर्ण दक्षता तसेच हरवलेल्या मालमत्तेची योग्य मालकाला त्वरित परतफेड करण्याची बांधिलकी पुन्हा अधोरेखित झाली आहे. आरपीएफ, नांदेड विभाग सातत्यपूर्ण दक्षता, गुप्त माहितीवर आधारित समन्वित कारवाया आणि प्रवासी-केंद्रित सेवांद्वारे रेल्वे परिसर सुरक्षित, संरक्षित व प्रवासीहितैषी ठेवण्यासाठी कायम कटिबद्ध आहे.

