पुणे (प्रतिनिधी) – सामाजिक बांधिलकी जपत रक्तदानासारख्या जीवनदायी कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा गौरव करण्याच्या उद्देशाने सुजय प्रतिष्ठान मैत्री रक्ताची यांच्या वतीने कै. सुजय सुरेश सकपाळ यांच्या १३ व्या स्मृतिप्रीत्यर्थ भव्य रक्तदान शिबिर, आयुर्वेदिक आरोग्य तपासणी शिबिर आणि सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत उद्यान मंगल कार्यालय, खजिना विहीर चौक, सदाशिव पेठ, पुणे येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती सुजय प्रतिष्ठानचे संस्थापक सुरेश ग. सकपाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेला डॉ. विठ्ठल जाधव (आयपीएस, विशेष पोलीस महानिरीक्षक – सेवानिवृत्त), सुनील मोरे, हेमंत सोनवणे, सागर भंडारी, हरिभाऊ सकपाळ तसेच सुधीर ग. सकपाळ (संस्थापक, सुजय प्रतिष्ठान – मैत्री रक्ताची) आदी मान्यवर उपस्थित होते.
या सामाजिक उपक्रमात नागरिकांसाठी भव्य रक्तदान शिबिर, मोफत आयुर्वेदिक आरोग्य तपासणी, अल्पदरात आयुर्वेदिक औषधांचे वितरण तसेच मोफत कांस्यथाळी मसाज यांसारख्या विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. रक्तदानामुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळू शकते. त्यामुळे युवकांसह सर्व नागरिकांनी या सामाजिक अभियानात सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसनजी भोसले हे राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून मेघराज राजेभोसले (अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ), शिवकुमारजी साळुंखे (आयआरएस) तसेच डॉ. विठ्ठल जाधव (आयपीएस, विशेष पोलीस महानिरीक्षक – सेवानिवृत्त) उपस्थित राहणार आहेत. याशिवाय प्रशासकीय, सामाजिक, वैद्यकीय, चित्रपट, पत्रकारिता, उद्योग, शिक्षण आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमाला लाभणार आहे.
सुजय प्रतिष्ठानचे संस्थापक सुरेश ग. सकपाळ व सुधीर ग. सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, समाजातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे, मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घ्यावा आणि सन्मान सोहळ्यास उपस्थित राहून समाजोपयोगी कार्याला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन सुजय प्रतिष्ठान – मैत्री रक्ताची यांच्या वतीने करण्यात आले आहे.
