नांदेड (प्रतिनिधी) – हदगाव तालुक्यातील तामसा येथे एका व्यक्तीला त्याचे वैयक्तिक फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत एक लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी तामसा पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ जून २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास तामसा येथील फिर्यादी बाळासाहेब शिरसिंगार (वय ३८) यांना आरोपी संजय उर्फ पंढरी दिगांबर पवार व दत्ताभाऊ बाबुराव पवार यांनी संगनमत करून फोन केला. आरोपींनी फिर्यादीचे वैयक्तिक फोटो व व्हिडिओ आपल्याकडे असल्याचे सांगून, ते डिलीट करायचे असतील तर एक लाख रुपये द्यावे, अन्यथा ते प्रसारित करू, अशी धमकी देत खंडणीची मागणी केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून तामसा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १३९/२०२६ नोंद करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत कलम ३०८(१), ३०८(२) व ३०८(३)(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कत्ते करीत आहेत.
