परभणी (परभणी)- नागरिकांच्या तक्रारींचे जलद निवारण करणे आणि पोलीस-नागरिक यांच्यातील संवाद वाढवून जनतेचा पोलिसांवरील विश्वास दृढ करण्याच्या उद्देशाने नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी परभणीत जनसंवाद उपक्रम राबविला. या उपक्रमांतर्गत त्यांनी तक्रारदारांच्या अडचणी प्रत्यक्ष जाणून घेतल्या. दिनांक १४ जुलै रोजी परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्याच्या मोहिमेअंतर्गत शहाजी उमाप यांनी परभणी जिल्ह्याची भेट घेतली होती. सकाळी कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर, दुपारी ३:०० ते ४:३० या वेळेत त्यांनी जिल्ह्यातील सामान्य नागरिकांशी संवाद साधला. या संवाद सत्रादरम्यान एकूण २२ तक्रारदारांनी आपले लेखी अर्ज पोलीस उप महानिरीक्षकांकडे सुपूर्द केले. यामध्ये प्रामुख्याने मालमत्ता विषयक वाद, सायबर फसवणूक, हरवलेले व्यक्ती, दाखल गुन्ह्यांचा तपास आणि अवैध व्यवसायांशी संबंधित तक्रारींचा समावेश होता. प्राप्त तक्रारींची गांभीर्याने दखल घेत श्री. उमाप यांनी संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस ठाणे प्रभारी यांना या तक्रारींवर त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. संवेदना पोर्टलद्वारे होणार संनियंत्रण तक्रारींच्या शीघ्र सोडवणुकीसाठी पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने संवेदना ही तक्रार निवारण प्रणाली कार्यान्वित केली आहे. जनसंवाद मध्ये प्राप्त झालेले सर्व अर्ज या पोर्टलवर अपलोड केले जाणार असून, प्रत्येक तक्रारीवर काय कारवाई झाली याचा आढावा नांदेड परिक्षेत्र कार्यालयामार्फत नियमितपणे फीडबॅकद्वारे घेतला जाईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. या प्रसंगी परभणीचे पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी आणि शहरातील पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते. Kanthak Suryatal Post Views: 699 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation मराठवाड्यात विकासाची मोठी सुप्तशक्ती – ज्येष्ठ विचारवंत माधव भंडारी नांदेडमध्ये मुकेशजी माथुर फॅन क्लब तर्फे सात अजूबे… सुरावटींची सजणार मैफल