नांदेड (प्रतिनिधी)- वजीराबाद पोलीस ठाणे सध्या न्याय देण्याच्या एका अभिनव पद्धतीमुळे जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे. अनुसूचित जातीच्या (नवबौद्ध) व्यक्तीला जातीवाचक शिवीगाळ करणे, बंदूक दाखवून जीवे मारण्याची धमकी देणे आणि त्यानंतर तक्रार करणाऱ्या वकिलावरच दबाव आणणे, हे तर आता जुने झाले. खरी गंमत तर तपासाच्या नावाखाली सुरू असलेल्या खास पाहुणचारात आहे! गोपनीयतेचा फज्जा आणि आरोपीची तत्परता ॲड. प्रमोद नरवाडे यांनी ऑनलाइन तक्रार केल्यावर पोलिसांनी साक्षीदारांचे जबाब नोंदवले खरे, पण ते इतके गोपनीय राहिले की साक्षीदार पोलीस ठाण्यातून बाहेर पडायच्या आत ती माहिती थेट आरोपीच्या कानापर्यंत पोहोचली. कायद्याने साक्षीदारांचे संरक्षण करणे अपेक्षित असताना, आरोपी १० ते १२ जणांची वऱ्हाडी मंडळी घेऊन थेट साक्षीदाराच्या घरी पोहोचला आणि त्याला जबाब बदलण्यासाठी प्रेमाने (धमकावून) समज देऊ लागला.या कार्यक्रमात ऍड. अब्दुल सलाम उर्फ मूकरम या माणसाने तो साक्षीदार पोलीस ठाणे वजिराबाद येथे नेला असा आरोप ऍड.प्रमोद नरवाडे करतात. या संदर्भाने वजिराबाद पोलीस ठाण्याचे सीसीटीव्ही तपासले तर मी खरे बोलत आहे हे सिद्ध होईल असे ऍड. प्रमोद नरवाडे सांगतात. पोलीस ठाण्यातच रंगली मैत्रीपूर्ण चर्चा? सर्वात बोचरी बाब म्हणजे, खुद्द पोलीस ठाण्यातच आरोपीच्या समर्थकांसाठी रेड कार्पेट टाकले गेल्याचा आरोप होत आहे. पोलीस निरीक्षक अजित कुंभार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक चम्मा आणि पोलीस अंमलदार हबीब चाऊस यांच्या मौल्यवान उपस्थितीत एका साक्षीदाराला चक्क एका स्वतंत्र खोलीत नेऊन आरोपीच्या साथीदारांसोबत चर्चा (दबाव) करायला बसवण्यात आले, अशी माहिती समोर येत आहे. यालाच कदाचित पारदर्शक तपास म्हणत असावेत! कायद्याची ऐशी-तैशी आणि कलम ४ चा विसर अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, १९८९ मधील कलम ४ स्पष्ट सांगते की, जर पोलीस अधिकाऱ्याने आपल्या कर्तव्यात जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, तर त्याच्यावरही कारवाई होऊ शकते. तसेच, BNSS, २०२३ नुसार संज्ञेय गुन्ह्याची माहिती मिळताच तातडीने एफआयआर नोंदवणे बंधनकारक आहे. मात्र, वजीराबादमध्ये कायद्याची ही कलमे कदाचित कपाटात धूळ खात पडली असावीत. साक्षीदार भयभीत, प्रशासन सुस्त! साक्षीदार शेख नजीब इतके भयभीत झाले आहेत की त्यांच्या आईची प्रकृती खालावली आहे, तर दुसरे साक्षीदार सोमेश यांनाही आता दबावाची भीती वाटू लागली आहे. तरीही, पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांनी निष्पक्ष अधिकाऱ्याकडून तपास आणि तातडीने कारवाई करवून घ्यावी असे ऍड. प्रमोद नरवाडे सांगतात. वजिराबाद पोलीस ठाण्यात १९९५ च्या नियमांतील तरतुदी केवळ कागदावरच नाचताना दिसत आहेत. जर पोलिसांचा हा मैत्रीपूर्ण तपास असाच सुरू राहिला, तर पीडितांना न्यायासाठी सक्षम न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असा इशारा तक्रारदारांनी दिला आहे. आता पोलीस अधीक्षक या विशेष पाहुणचाराची दखल घेऊन दोषी अधिकाऱ्यांवर जाणीवपूर्वक कारवाई करतील असा विश्वास नांदेडकरांना आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,367 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation तुमची गाडी मायलेज देत नाहीये? मग तुम्ही गाढव आहात! – नितीन गडकरींच्या वक्तव्याने खळबळ. काय आहे सत्य? डिजिटल अरेस्टची भीती दाखवून ज्येष्ठ नागरिकाची 14.15 लाखांची ऑनलाइन फसवणूक