विष्णुपुरी (प्रतिनिधी)-परवा विष्णूपुरी येथील महामार्गावरील पुलाची भिंत कोसळल्याची खळबळजनक घटना घडल्यानंतर, आता संबंधित कंत्राटदाराकडून आपले पातक लपवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू झाले आहेत. पुलाच्या ज्या बाजूची भिंत कोसळली, त्याच्या विरुद्ध बाजूला असलेल्या भिंतीलाही मोठ्या भेगा गेल्या आहेत. या भेगा आता सिमेंट भरून बुजवण्याचे काम घाईघाईने केले जात असून, हा प्रकार म्हणजे निकृष्ट बांधकामावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेच्या सखोल चौकशीसाठी उद्या परवा दिल्ली येथून एक उच्चस्तरीय चौकशी समिती घटनास्थळाला भेट देणार आहे. ही समिती पुलाच्या बांधकामातील तांत्रिक त्रुटी आणि भ्रष्टाचाराचा शोध घेणार आहे. मात्र, समितीला संबंधित गुत्तेदाराचा भ्रष्टाचार दिसू नये, यासाठी सिमेंट ब्लॉकच्या भेगांमध्ये सिमेंट भरून सारवासारव केली जात आहे. रात्रीतून अचानक सुरू झालेल्या या कामामुळे कंत्राटदाराच्या मनात असलेली भीती स्पष्टपणे दिसून येत आहे.
स्थानिक नागरिकांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. हे काम म्हणजे केवळ थुक्कापॉलीस आणि तात्पुरती मलमपट्टी असून, प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा हा प्रकार आहे, असे मत व्यक्त केले जात आहे. केवळ वरवरच्या भेगा बुजवून मूळ स्ट्रक्चरल दोष लपवले जात आहेत, जे भविष्यात पुन्हा एकदा मोठ्या दुर्घटनेला निमंत्रण देऊ शकतात.
परवा घडलेली घटना ही केवळ एक गफलत नसून, त्यामागे कंत्राटदाराचा निकृष्ट दर्जाचा आणि भ्रष्ट कारभार कारणीभूत असल्याची चर्चा आहे. आता उद्या येणारी दिल्लीची चौकशी समिती या कॉस्मेटिक कामाला भुलणार की कंत्राटदाराचे पितळ उघडे पाडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोषींवर कडक कारवाई होऊन पुलाचे पुनर्गठन करण्याची मागणी जोर धरत आहे.
नागरिकांचे मत: हे काम म्हणजे प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न असल्याचे वाटते, परंतु प्रशासनाने यावर काय अधिकृत पाऊल उचलले आहे किंवा त्यांची भूमिका काय आहे, याचा माहिती मिळालेली नाही.
संबंधित व्हिडीओ ….
