नांदेड – नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप हे मंगळवार, दि. ३० जून २०२६ रोजी नांदेड जिल्हा पोलीसांच्या कामकाजाचा मासिक आढावा घेण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड येथे भेट देणार आहेत.नागरिकांनी सुद्धा या संधीचा फायदा घेऊन आपल्या समस्या शहाजी उमाप यांच्याकडे मांडाव्यात.
या भेटीदरम्यान दुपारी ३.०० ते ५.०० या वेळेत उमाप हे पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड येथे नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या पोलीस प्रशासनाशी संबंधित तक्रारी, अडचणी व समस्या जाणून घेणार आहेत. नागरिकांना आपले म्हणणे थेट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची ही महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे.
पोलीस प्रशासनाने जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केले आहे की, ज्यांना कायदा व सुव्यवस्था, पोलीस कामकाज किंवा इतर कोणत्याही पोलीस विषयक समस्या मांडायच्या असतील, त्यांनी संबंधित कागदपत्रांसह निर्धारित वेळेत पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड येथे उपस्थित राहावे.
नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्यावर तातडीने योग्य कार्यवाही करण्याच्या उद्देशाने हा संवाद आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेऊन आपल्या समस्या थेट पोलीस उप महानिरीक्षकांसमोर मांडाव्यात, असे आवाहन पोलीस उप महानिरीक्षक कार्यालय, नांदेड परिक्षेत्राच्या वतीने करण्यात आले आहे.
