नांदेड (प्रतिनिधी)- राजकारणात आमदार फुटतात हे आपण ऐकले आहे, पण हिंगोली पोलीस दलात तर चक्क ३९ पोलीस आमदारांना (अतिउत्साही कर्मचारी) मुख्यालयाचा रस्ता दाखवून नव्या पोलीस अधीक्षकांनी आपल्या बॅटिंगची धडाकेबाज सुरुवात केली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आगमनानंतर नांदेड पोलीस दलातील प्रस्थापित हलवायांची आणि मोदक प्रेमींची झोप उडाली असून, खाकी वर्दीला लागलेल्या भ्रष्टाचाराच्या साखरेचा पाकात आता कडू कारल्याचा रस मिसळला जाण्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. मोदकांचा प्रसाद आणि खाकीची मर्यादा नांदेडच्या पवित्र भूमीत सध्या गणपती बाप्पा नसतानाही मोदकांचा मोठा गाजावाजा सुरू आहे. अर्थात, हे मोदक भक्तीचे नसून शक्ती आणि वरकमाईचे आहेत. ज्या पोलिसांनी अंगावरची ही ताठ खाकी वर्दी घाम गाळून, स्पर्धा परीक्षांची पुस्तके रडून मिळवली, त्यांना आता ही वर्दी बेकायदेशीर धंद्यांच्या ओझ्याखाली दबलेली दिसत नाही, हे दुर्दैवच! पण सवय मोठी वाईट असते. मोदक खाण्याची आणि चारणे चारण्याची सवय जडलेल्या या कर्तबगार पोलिसांना आता साध्या पगारावर घर चालवणे म्हणजे एव्हरेस्ट सर करण्यासारखे वाटू लागले आहे. साहेबांचा नो-शुगर डाएट! नव्या पोलीस अधीक्षकांनी येताच स्पष्ट केले आहे की, मला काहीही नको! साहेबांच्या या एका वाक्याने लाचखोरीच्या साखरेवर जगणाऱ्या अनेक कीड लागलेल्या यंत्रणांना आता मधुमेहाचा झटका आला आहे. कोणालाही बेकायदेशीर कामात सूट मिळणार नाही, अशी तंबी दिल्याने आतापर्यंत अर्थपूर्ण वाटाघाटी करणाऱ्या मोदकवाल्या पोलिसांचे काय होणार? हा प्रश्न सध्या पोलीस दलातील गल्ल्यांमधून खोचकपणे विचारला जात आहे. स्वतःला बदलण्याची शेवटची संधी आजच्या परिस्थितीत जेव्हा वेतन पुरेसे असतानाही हवेची आणि पैशांची हाव सुटत नाही, तेव्हा वर्दीला डाग लागणे स्वाभाविक आहे. मेहनत करून मिळवलेली ही प्रतिष्ठा मोदकाच्या एका तुकड्यासाठी गहाण ठेवणाऱ्या पोलिसांनी आता तरी सुधारावे, हीच शेवटची संधी आहे. अन्यथा, मुख्यालयाची वारी करण्यासाठी आणखी अनेक जागा रिकाम्याच आहेत. थोडक्यात सांगायचे तर, नांदेड पोलीस दलात आता शुगर फ्री कारभाराला सुरुवात झाली आहे. ज्यांना हा डाएट झेपेल तेच टिकतील, बाकीच्यांनी मोदक सोडून मुख्यालयाची खिचडी खायला तयार राहावे! Kanthak Suryatal Post Views: 960 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation शाब्बास विश्वास नांगरे पाटील साहेब शाब्बास .. पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांचा नागरिकांशी थेट संवाद; समस्यांच्या निराकरणाची सुवर्णसंधी