नांदेड (प्रतिनिधी)- आपल्या कार्यशैलीमुळे गुजरात, मुंबई, दिल्ली आणि आता तेलंगणा राज्यातही नांदेडचे नाव मोठे करणारे पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर चव्हाण पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे दिसत आहेत. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, चव्हाण हे तेलंगणा राज्यातील बेलुरी जिल्ह्यातील कुबीर पोलीस ठाण्यात उपस्थित असल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चव्हाण हे कोणत्यातरी गुटख्याच्या तपासासाठी तिथे गेले आहेत. विशेष म्हणजे, या तपासात आरोपी पकडले जातात, मात्र तेलंगणातून आणलेला आरोपी प्रत्यक्षात कधीच कोणाला दिसत नाही किंवा पोलिसांनीही तशी माहिती कधी उपलब्ध करून दिली नाही, अशी चर्चा आहे.
परवानगीचा पेच आणि जुना इतिहास: नियमांनुसार, जिल्ह्याबाहेर तपासासाठी जायचे असल्यास पोलीस अधीक्षकांची आणि राज्याबाहेर जाण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षकांची पूर्वपरवानगी आवश्यक असते. मात्र, परमेश्वर चव्हाण आणि पोलीस अंमलदार शेख इजराइल हे कुबीर पोलीस ठाण्यासमोर उभे असलेले फोटो समोर आल्यानंतर, त्यांनी खरोखरच वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेतली आहे का? आणि संबंधित पोलीस ठाण्यात त्यांच्या आगमनाची नोंद आहे का? असे गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
परमेश्वर चव्हाण यांचा हा विनापरवानगी प्रवास करण्याचा हा पहिलाच प्रकार नाही. यापूर्वीही परवानगीशिवाय खाजगी गाड्या घेऊन राज्याबाहेर गेल्याप्रकरणी पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी त्यांना दंड ठोठावला होता. तरीही, पुन्हा एकदा नियमांची पायमल्ली करून हा अनधिकृत शोध सुरू आहे का, अशी शंका व्यक्त केली जात आहे. एकीकडे गुटखा पकडल्याचा दावा केला जातो, तर दुसरीकडे आरोपींचा पत्ता नसतो, यामुळे या विनापरवानगी मोहिमांमागे नेमके गौडबंगाल काय, असा प्रश्न आता पोलीस वर्तुळात विचारला जात आहे.
या पर राज्यात गेलेल्या पोलीस पोलीस उप निरीक्षक परमेश्वर चव्हाण आणि पोलीस अंमलदार शेख इज्राईल यांच्या मोबाईल फोनची तपासणी आणि सीडीआर आणि एसडीआरची तपासणी झाली तर बरेच मोठे सत्य समोर येण्याची शक्यता आहे असे बोलले जात आहे.सॊबतच परमेश्वर चव्हाण यांची बदली पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी परभणी जिल्ह्यात केलेली आहे,तरीपण याना का कार्यमुक्त करण्यात आलेले नाही हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे.
