पोलिसांच्या जीवाशी खेळणारी बेफिकिरी; तीन युवकांना पोलीस कोठडी

वाहन चालविताना जबाबदारीचे भान ठेवण्याचे आवाहन

नांदेड (प्रतिनिधी) – वाहतूक तपासणीदरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून त्यांच्या जीवाला धोका निर्माण केल्याच्या गंभीर प्रकरणात तीन युवकांना न्यायालयाने २२ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे युवकांमध्ये वाढत चाललेली बेफिकिरी आणि कायद्याबद्दलची उदासीनता पुन्हा एकदा समोर आली आहे.

भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संतोष तांबे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ जूनच्या रात्री सुमारे ११.४५ ते १९ जूनच्या १२.१५ दरम्यान वाहन तपासणी सुरू असताना एमएच-२६-सीव्ही-९८९८ क्रमांकाची हॅरियर कार तेथे आली. पोलिसांनी वाहनाची तपासणी करण्यासाठी इशारा दिल्यानंतर वाहनातील युवक तेथून निघून गेले. मात्र काही वेळाने ते पुन्हा घटनास्थळी आले आणि त्यांनी वाहन पोलिसांच्या दिशेने नेल्याचा आरोप आहे. या कृतीमुळे कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला होता.

या प्रकरणात तरणजित सिंघ अमरिकसिंग बल (वय १८ वर्षे ९ महिने), अमरिंदरसिंघ कुलप्रतापसिंघ कपूर (वय १९ वर्षे ३ महिने) आणि हर्षदीपसिंघ नरेंदरसिंघ सुखई (वय १९ वर्षे ७ महिने) या तिघांना अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान आणखी काही बाबींचा उलगडा होण्याची शक्यता असल्याने पोलीस कोठडी आवश्यक असल्याचा युक्तिवाद सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. जी. महाजन यांनी न्यायालयात केला. तो ग्राह्य धरत न्यायालयाने तिघांना २२ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.या घटनेतील एक आरोपी परविंदरसिंघ उर्फ अंगद बसंतसिंघ नेहंग हा फरार आहे.

ही घटना युवकांसाठी मोठा धडा आहे. क्षणिक आवेश, बेदरकार वाहनचालक वृत्ती किंवा कायद्याला आव्हान देण्याची मानसिकता केवळ स्वतःचेच नव्हे तर इतरांचेही जीव धोक्यात घालू शकते. पोलिसांवर हल्ला करणे किंवा त्यांच्या कामात अडथळा निर्माण करणे हा गंभीर गुन्हा असून युवकांनी कायद्याचा सन्मान राखत जबाबदार नागरिक म्हणून वागण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!