नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्रात सुरू असलेल्या अवैध व्यवसाय विरोधी विशेष मोहिमेत पोलिसांनी मोठी कारवाई करत विविध गुन्ह्यांमध्ये सहभागी आरोपींवर धडक कारवाई केली असून एकूण 2 कोटी 86 लाख 9 हजार 883 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही मोहीम 1 ते 31 मे 2026 या कालावधीत राबविण्यात येत आहे.
मोहिमेच्या 17 व्या दिवशी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने नांदेड जिल्ह्यातील लिंबगाव पोलीस ठाणे हद्दीतील मौजे बोरगाव येथील गोदावरी नदी घाटावर अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन हायवा, एक टिपर, जेसीबी मशीन, इंजिन बोट, फायबर बोट, दहा तराफे तसेच 50 ब्रास वाळूसह 1 कोटी 36 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दरम्यान, अवैध गुटखा विक्री करणाऱ्या दोन जणांवर कारवाई करून 30 लाख 69 हजार 748 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तसेच मटका-जुगार खेळविणाऱ्या व खेळणाऱ्या 11 जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्याकडून 91 हजार 90 रुपये जप्त करण्यात आले.
अवैध दारू विक्रीविरोधातही पोलिसांनी कठोर भूमिका घेत 34 जणांविरुद्ध 29 गुन्हे दाखल केले असून 1 लाख 88 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याशिवाय अवैध वाळू उपसा प्रकरणी आणखी तीन गुन्हे नोंदवून 1 कोटी 16 लाख 55 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
शस्त्र अधिनियम, कोटा कायदा तसेच इतर विविध कायद्यांअंतर्गत मिळून एकूण 44 कारवाया करण्यात आल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अवैध व्यवसायांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाने खबर (९१ ५० १०० १०० या व्हाट्सअप कमांकावर) नावाची हेल्पलाईन सुरू केली असून नागरिकांनी आपल्या परिसरातील अवैध व्यवसायांची माहिती फोन किंवा व्हॉट्सअॅपद्वारे देण्याचे आवाहन पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.
आरोपीचे नावे पुढील प्रमाणे आहेत.
अर्जुन विलासराव क्षिरसागर रा.राबोरगाव, नांदेड,राजेश चंदर गायकवाड रा. येलापुर, धर्माबाद, पुजा नितिन गिरडे रा. असदवन, नांदेड, विकास संजय मोरे रा. सुनिल नगर सिडको नांदेड, अविनाश नामदेव राठोड रा. जानापुरी, नांदेड, शेख रमजानी शेख नबी शेख नबी रा.खडकपुरा, नांदेड, वजीराबाद, नांदेड, शेख वसीम शेख ईसार रा.खडकपुरा, समशाद अन्सारी रफदिन अन्सार रा.विष्णुपरी, शेख मोसीन गणीसाब रा.सोनखेड.

