नांदेड (प्रतिनिधी)- राज्यात कायदा-सुव्यवस्था नेमकी पोलिसांच्या ताब्यात आहे की रस्त्यावरच्या स्वयंघोषित चौकशी समित्यांच्या, असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित करणारी धक्कादायक घटना २३ एप्रिल रोजी रात्री साडेसातच्या सुमारास हदगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. गाडीत गाई आहेत का? या एका प्रश्नाने सुरू झालेला प्रकार मारहाण, दगडफेक, लूट आणि शेवटी कागदोपत्री सत्य बदलण्याच्या आरोपांपर्यंत जाऊन पोहोचला आहे.
केरळ राज्यातील रहिवासी अल्विन हा KA-20-AC-4284 क्रमांकाचा ट्रक घेऊन नागपूरकडे फळांची वाहतूक करत होता. वारंगा ते हदगाव रस्त्यावर काही व्यक्तींनी ट्रक अडवत गाडीत काय आहे, गाई आहेत का, अशी चौकशी सुरू केली. अधिकृत अधिकार नसतानाही चौकशीचा आव आणल्याने चालकाला संशय आला. परिसरात अंधार पडलेला होता . लुटमारीची भीती वाटल्याने अल्विनने ट्रक पुढे नेण्याचा प्रयत्न केला. याच क्षणापासून कथित कायद्याचे स्वयंसेवक सक्रिय झाले. दुसरी चारचाकी गाडी बोलावण्यात आली. अशोक लेलँड दोस्त गाडीतून आलेल्या लोकांनी ट्रकचा पाठलाग करत दगडफेक सुरू केली. काही वाहने आडवी लावून अखेर ट्रक थांबवण्यात आला.
यानंतर सुरू झाली खरी दहशत
चालक आणि क्लिनरला खाली उतरवून नाव, ओळख विचारण्यात आली. अल्विनने आपले नाव सांगितले. क्लिनरचे नाव नदाफ कुरेशी असल्याचे समजताच जमावाचा स्वर अचानक आक्रमक झाल्याचा आरोप आहे. क्लिनरला बेदम मारहाण करण्यात आली. ट्रकच्या काचा फोडण्यात आल्या. ट्रकमध्ये फळे असल्याचे स्पष्ट दिसत असूनही वाहनाची तोडफोड करण्यात आली.
इतक्यावरच जमाव थांबला नाही. ट्रकमधील ४० हजार रुपये रोख रक्कम आणि चालकाचा एक मोबाईल फोनही लंपास करण्यात आल्याचा गंभीर आरोप तक्रारदाराने केला आहे. म्हणजे चौकशीच्या नावाखाली थेट लुटीचाच प्रकार घडल्याचे चित्र समोर येत आहे.आणि मग नेहमीचा संवाद लवकर गाडी घेऊन निघ, नाहीतर पोलिस येतील! हल्लेखोरांनी पोलिसांचे नाव धमकीसाठी वापरले, हीच या घटनेची सर्वात मोठी विडंबना म्हणावी लागेल.
जखमी अवस्थेतील चालक व क्लिनरला स्थानिक नागरिकांनी मदत करून सरकारी दवाखान्यात दाखल केले. पुढे त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आले. दरम्यान एआयएमआयएमचे स्थानिक प्रदेश नेते सय्यद मोईन यांनी रुग्णालयात भेट देऊन एफआयआरची प्रत पाहिली आणि तेव्हा कथानकाला वेगळेच वळण मिळाले. तक्रारदार अल्विन सांगतो ती घटना आणि पोलिसांनी नोंदवलेली तक्रार यामध्ये मोठा फरक असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अल्विनच्या मते हा प्रकार जबरी चोरी, लूट आणि जीवघेणा हल्ला असा आहे. मात्र पोलिस नोंदींमध्ये प्रकरणाला केवळ गंभीर दुखापत या चौकटीत बसवण्यात आल्याचे दिसते.अलिविन सांगत होता की,हल्लेखोरांकडे मोठे लांब धारधार शस्त्र होते. संकेत दिघे सांगतात की पंचने मारले आहे. तज्ज्ञांच्या मते पंच मुले अशी मोठी जखम होऊच शकत नाही. म्हणजे पुन्हा ते की खरे तर देवच जाणे.
हदगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संकेत दिघे यांनी जशी तक्रार आली तशी नोंद केली असून आरोपी अरविंदला अटक केली आहे, असे सांगितले. मात्र येथे मुख्य प्रश्न कायम आहे मराठी भाषा नीट समजत नसलेल्या परराज्यातील चालकाची तक्रार मराठीत इतकी व्यवस्थित कशी नोंदवली गेली? यामुळे पुन्हा एकदा जुनी म्हण आठवते “पोलिस खाते करील तेच होईल.”
घटना एक, वास्तव दुसरे आणि कागदावरील सत्य तिसरे अशी परिस्थिती असल्याचा आरोप आता उघडपणे होत आहे. एआयएमआयएमकडून यासंदर्भात निवेदन देण्यात आले असून निष्पक्ष चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
अल्विन सांगतो तो प्रकार लूट आणि जीवघेणा हल्ला आहे. पोलिस नोंद सांगते तो फक्त दुखापतीचा गुन्हा आहे.
खरं काय?
लुट झाली की गैरसमज झाला?
जमावशाही की कायद्याचं राज्य?
उत्तर अजूनही धूसरच… आणि सत्य कदाचित एखाद्या फाईलमध्ये शांत झोपलेलं.

