नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील इस्लामपूरा भागात जमलेल्या पाण्यात खेळण्यासाठी गेलेल्या चार मुलांचा मृत्यू झाला. त्यानंतर एआयएमआयएमच्या 12 नगरसेवकांनी नांदेडच्या महापौर कविता मुळे यांना एक प्रस्ताव सादर करून या मुलांच्या कुटूंबियांना येत्या सर्वसाधारण सभेत प्रस्ताव ठेवून प्रत्येक कुटूंबाला 50 लाख रुपये आणि त्यांच्या कुटूंबियांमधील लोकांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेेच्या शहर आस्थापनेवर कायम स्वरुपी नोकरी देण्याची मागणी केली आहे.
एआयएमआयएमचे नगरसेवक मोहम्मद अलताफ हुसेन, मोहम्मद मसुद अहेमद, सय्यद मुजीब, सय्यद फसीयोद्दीन, अब्दुल लतिफ, मोहम्मद नासेर, आशिया बेगम, सायना खानम, अश्र्विनी धोंगडे, शिफा तरन्नुम, मुस्कान नाज, शमिम बेग, अलकेसरी सुमय्या गुलफशा, बेबी शाहिस्ता, कुरेशी रिहाना बेगम या सर्वांनी सुचक आणि अनुमोदक या धर्तीवर एक प्रस्ताव तयार केला. या प्रस्तावानुसार प्रभाग क्रमांक 11 च्या हद्दीमधील इस्लामपुरा येथील विद्यार्थी मोहम्मद अदनान मोहम्मद फेरोज (10), मोहम्मद अली मोहम्मद इद्रीस (13) सय्यद इरफान सय्यद फेरोज(13), अयान इब्राहिम बागवान (11) या चार विद्यार्थी शाळेतून परत येत असतांना दि.16 एप्रिल रोजी मोठ्या खड्यात जमलेला पाण्याचा साठा पाहुन त्यात खेळण्यासाठी उतरले पण दुर्देवाने त्यांचा मृत्यू झाला.
या सर्व मयत चार बालकांच्या वारसांना प्रत्येकी 25 लाख रुपये महानगरपालिकेमार्फत अनुदान देण्यात यावे आणि चारही मृत्यू पावलेल्या मुलांच्या वारसांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार महानगरपालिकेच्या आस्थापनावर कायम स्वरुपी नोकरी देण्यात यावी. सोबतच या मरण पावलेल्या वारसांना घरकुल या योजनेत घर तयार करून द्यावेत. हा आमचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत ठेवून मान्य करून देण्यात यावा असे या निवेदनात नमुद आहे.

