नांदेड जिल्ह्यासाठी पिवळा इशारा : १७ ते २० एप्रिलदरम्यान उष्मालाट व अवकाळी पावसाची शक्यता

नांदेड – जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नांदेड यांनी प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांच्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी १७, १८, १९ व २० एप्रिल २०२६ या चार दिवसांसाठी यलो अलर्ट (पिवळा इशारा) जारी केला आहे.

पुढील चार दिवसांचा हवामान अंदाज

१७ एप्रिल : जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्मालाट येण्याची शक्यता.
१८ एप्रिल : तुरळक ठिकाणी उष्मालाट; तसेच दुपारनंतर/संध्याकाळी विजेच्या कडकडाटासह गडगडाटी वातावरणात हलका ते मध्यम पाऊस.
१९ व २० एप्रिल : तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह गडगडाट आणि हलका ते मध्यम पाऊस.
उष्मालाट काळात नागरिकांनी काय काळजी घ्यावी?

 हे करा :

· भरपूर पाणी प्या (डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार), ओआरएस, ताक, लिंबूपाणी, नारळ पाणी, लस्सी किंवा भाताची पेज घ्या.
· हलके, सैलसर सुती कपडे वापरा, डोके झाकून ठेवा, छत्री किंवा टोपी वापरा.
· डोळ्यांसाठी गॉगल व त्वचेसाठी सनस्क्रीन वापरा.
· ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, आजारी व स्थूल व्यक्तींची विशेष काळजी घ्या.

हे टाळा :

· दुपारी १२ ते ३ या वेळेत उन्हात जाणे व श्रमाची कामे टाळा.
· अनवाणी चालू नका.
· अल्कोहोल, चहा, कॉफी, शीतपेये, तिखट, तेलकट, जास्त मीठाचे व उच्च प्रथिनयुक्त अन्न टाळा.
· शिळे अन्न टाळा.
· चारचाकी वाहनात मुले किंवा प्राणी ठेवू नका.
· पेट्रोलचे दिवे किंवा बत्ती लावू नका  यामुळे अनावश्यक उष्णता निर्माण होते.

या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित यंत्रणा व नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, नांदेड यांनी केले आहे.

संपर्क : जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्र – (०२४६२) २३५०७७, टोल फ्री – १०७७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!