धर्माबाद–निजामाबाद पोलिसांची संयुक्त मोहीम; मुख्य सूत्रधार अद्याप फरार
नांदेड (प्रतिनिधी)- क्रिकेट सट्टेबाजी प्रकरणातील कारवाईला गती देत धर्माबाद आणि निजामाबाद पोलिसांनी संयुक्त अभियान राबवून एका आरोपीला अटक केली. कुलूपबंद घरात लपून बसलेल्या संशयिताला पोलिसांनी छापा टाकून ताब्यात घेतल्याने सट्टेबाजी नेटवर्कमध्ये खळबळ उडाली आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सोमवारी दुपारपासून संशयितावर नजर ठेवण्यात येत होती. स्थानिक पातळीवर गुप्त हालचाली करत पोलिस पथकाने परिसराची पाहणी केली. मंगळवारी सकाळी कारवाई करत संबंधित घराचे कुलूप तोडण्यात आले आणि आत लपलेल्या आरोपी मनोज मानधनीला अटक करण्यात आली.
क्रिकेट सामन्यांवर मोठ्या प्रमाणात सट्टा लावणाऱ्या रॅकेटचा तपास सुरू असताना अनेक संशयितांची नावे पुढे आली होती. अटक केलेला आरोपी या साखळीतील महत्त्वाचा दुवा असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार तसेच काही पंटर अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
काही आरोपी परराज्य अथवा परदेशात आश्रय घेण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर धर्माबाद परिसरात विशेष लक्ष ठेवण्यात आले. फरार आरोपींचा माग काढण्यासाठी स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली असून तेलंगणा पोलिसांशी समन्वय साधून तपास अधिक वेगाने पुढे नेण्यात येत आहे.
धर्माबाद मध्ये तर पोलीस ठाण्याच्या शेजारीच भगवंतांचे मंदिर आहे.म्हणजे मोदक प्रसाद तेथे सुद्धा अर्पण केलं जात असेलच म्हणून निझामाबाद पोलिसांना ही सट्टेबाजची कार्यवाही करावी लागली असेल ? शहरात सुरू असलेल्या घडामोडींमध्ये मोदक प्रकरणाची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे. बहुधा मोदकांच्या प्रसाद मुळे हा प्रकार दीर्घकाळ बिनधास्तपणे सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात ऐकू येत आहे.
अलीकडेच घडलेल्या खून प्रकरणाच्या तपासादरम्यानही मोदक व्यवहाराचा धागा समोर येत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे तिहेरी खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर काही नगरसेवकांच्या नातलगांना सोबत प्रत्येकी पाच हजार मोदकांच्या देवाणघेवाणीबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
मागील दोन दिवसांपासून या संदर्भात शहरातील एका गुप्त ठिकाणी बैठका सुरू असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली असून, या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
