दरवर्षी १५ ऑक्टोबर हा दिवस जागतिक हात धुवा दिन म्हणून साजरा केला जातो. हातांची स्वच्छता ही केवळ आरोग्याची सवय नसून अनेक आजारांना प्रतिबंध करणारा सर्वांत सोपा, प्रभावी आणि स्वस्त उपाय आहे. साबणाने हात धुण्याची सवय प्रत्येकाने अंगीकारली, तर अतिसार, श्वसनसंसर्ग आणि अन्य संसर्गजन्य आजारांचा धोका कमी करता येतो. म्हणूनच, ‘स्वच्छ हातात दम आहे’ हा संदेश प्रत्येक घरापर्यंत, प्रत्येक शाळेपर्यंत आणि प्रत्येक गावापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. हातांची स्वच्छता म्हणजे आरोग्याचे संरक्षण संयुक्त राष्ट्र संघ आणि जागतिक आरोग्य क्षेत्रातील विविध संस्था हातांच्या स्वच्छतेला विशेष महत्त्व देतात. स्वच्छता आणि आरोग्य यांचा जवळचा संबंध आहे. आपल्या दैनंदिन जीवनात हातांचा वापर असंख्य कामांसाठी होतो. वस्तूंना स्पर्श करताना, खेळताना, प्रवास करताना, स्वयंपाक करताना किंवा सार्वजनिक ठिकाणी वावरताना हातांवर अनेक प्रकारचे जंतू जमा होऊ शकतात. हे जंतू डोळ्यांना दिसत नसल्यामुळे हात स्वच्छ दिसले म्हणजे ते पूर्णपणे स्वच्छ झाले, असे समजणे चुकीचे आहे. दूषित हातांमधून हे जंतू अन्न-पाण्यात किंवा तोंड, नाक आणि डोळ्यांच्या संपर्कातून शरीरात प्रवेश करू शकतात. मानवी विष्ठेतून पसरणारे रोगजंतू अतिसारासारख्या आजारांना कारणीभूत ठरू शकतात. दूषित हात, पाणी, अन्न आणि अस्वच्छ परिसर यांमुळे संसर्गाचा प्रसार होतो. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींना अशा संसर्गाचा अधिक धोका असतो. त्यामुळे हातांची स्वच्छता ही वैयक्तिक सवय असली, तरी तिचा संबंध संपूर्ण समाजाच्या आरोग्याशी आहे. हात धुण्याच्या सवयीचे ऐतिहासिक महत्त्व हातांच्या स्वच्छतेचे महत्त्व जगाला पटवून देणाऱ्या डॉक्टर इग्नाझ सेमेलवाईस यांचे योगदान ऐतिहासिक आहे. १९व्या शतकात त्यांनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी हात स्वच्छ धुण्याच्या सवयीवर भर दिला. त्यांच्या प्रयत्नांमुळे रुग्णालयांमध्ये हातांच्या स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित झाले. आजही आरोग्यसेवा क्षेत्रात हातांची स्वच्छता ही संसर्ग रोखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. कोरोना महामारीच्या काळात हात धुणे, सॅनिटायझरचा वापर आणि वैयक्तिक स्वच्छता यांविषयी समाजात मोठ्या प्रमाणावर जागृती झाली. मात्र, महामारीचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतरही ही सवय कायम राहणे आवश्यक आहे. एखाद्या संसर्गजन्य आजाराच्या काळापुरतीच नव्हे, तर दररोजच्या जीवनाचा भाग म्हणून हात धुण्याची सवय जोपासली पाहिजे. साबणाने हात धुण्याची योग्य पद्धत हात धुणे ही साधी गोष्ट वाटत असली, तरी अनेक जण घाईघाईने हात धुतात. त्यामुळे हातांच्या सर्व भागांची स्वच्छता होत नाही. हात धुताना तळवे, हातांच्या मागील बाजू, बोटांमधील जागा, अंगठे, नखांच्या आसपासचा भाग आणि मनगट स्वच्छ करणे आवश्यक आहे. प्रथम स्वच्छ वाहत्या पाण्याने हात ओले करावेत. त्यानंतर साबण लावून दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर घासावेत. हातांच्या मागील बाजू, बोटांमधील जागा, अंगठे आणि नखांच्या टोकांभोवती व्यवस्थित घासावे. ही प्रक्रिया किमान २० सेकंद करावी. त्यानंतर स्वच्छ वाहत्या पाण्याने हात खळखळून धुवावेत आणि स्वच्छ टॉवेलने किंवा योग्य पद्धतीने हात कोरडे करावेत. शौचालयाचा वापर केल्यानंतर, लहान मुलांची स्वच्छता केल्यानंतर, अन्न तयार करण्यापूर्वी, जेवण्यापूर्वी आणि खोकल्यानंतर किंवा शिंकल्यानंतर हात धुणे विशेष महत्त्वाचे आहे. केवळ पाण्याने हात धुण्यापेक्षा साबणाचा वापर अधिक प्रभावी ठरतो. मुलांमध्ये रुजवा स्वच्छतेचे संस्कार लहान मुले खेळताना माती, धूळ, खेळणी आणि विविध वस्तूंना स्पर्श करतात. त्यानंतर हात न धुता खाणे किंवा हात तोंडाला लावणे यामुळे संसर्गाचा धोका वाढू शकतो. म्हणूनच मुलांना लहान वयापासून साबणाने हात धुण्याची सवय लावणे आवश्यक आहे. शाळांमध्ये प्रार्थनेच्या वेळी, परिपाठात, चित्रकला, घोषवाक्ये, प्रात्यक्षिके आणि विविध जनजागृती उपक्रमांच्या माध्यमातून हातांच्या स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगता येते. शिक्षकांनी स्वतः या सवयीचे पालन करावे आणि पालकांनीही घरी मुलांसमोर स्वच्छतेचा आदर्श ठेवावा. मुले केवळ सांगितल्यामुळेच नव्हे, तर मोठ्यांचे अनुकरण करूनही शिकतात. जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफ यासारख्या संस्थांनी हातांच्या स्वच्छतेला संसर्गजन्य आजारांच्या प्रतिबंधातील महत्त्वाचा घटक मानले आहे. २००८ पासून १५ ऑक्टोबर हा जागतिक हात धुवा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाच्या माध्यमातून साबणाने हात धुण्याची सवय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो. स्वच्छ हात, निरोगी समाज साबण, पाणी आणि हात धुण्याची योग्य पद्धत या तीन साध्या गोष्टी अनेक आजारांचा धोका कमी करण्यास मदत करतात. यासाठी मोठा खर्च करण्याची आवश्यकता नाही; गरज आहे ती सातत्याची आणि जनजागृतीची. शाळा, ग्रामपंचायती, अंगणवाड्या, महाविद्यालये, महिला बचत गट आणि विविध सामाजिक संस्थांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. जागतिक हात धुवा दिनानिमित्त नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील नागरिक, महाविद्यालयीन युवक, शालेय विद्यार्थी, महिला बचत गट आणि ग्रामस्थांनी या उपक्रमांत सहभागी होऊन नियमितपणे साबणाने हात धुण्याचा संकल्प करावा आणि आपले आरोग्य सुरक्षित ठेवावे. आरोग्याचे संरक्षण नेहमी मोठ्या उपाययोजनांनीच होते असे नाही. कधीकधी एक छोटीशी सवयही मोठा बदल घडवून आणते. साबणाने हात धुण्याची सवय ही अशीच एक प्रभावी सवय आहे. स्वतः स्वच्छ राहूया, कुटुंबाला सुरक्षित ठेवूया आणि निरोगी समाजाच्या निर्मितीत योगदान देऊया. मिलिंद व्यवहारे जिल्हा परिषद, नांदेड ९४२२१८८०९४ Kanthak Suryatal Post Views: 63 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation हमने सनम को खत लिखा…आज जागतिक टपाल दिन!