शालेय सहलीमुळे विद्यार्थ्यांच्या अनुभवकक्षा रुंदावण्यास मदत होते

मुख्याध्यापक गंगाधर ढवळे यांचे बासर येथे प्रतिपादन; जवळा देशमुख प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी घेतले अध्ययन अनुभव
नांदेड – शालेय जीवनात विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहलीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शालेय तथा सहशालेय उपक्रमांतर्गत ‘सहल’ या उपक्रमामुळे प्रत्यक्ष अध्ययन अनुभव देता येतात. पुस्तकी ज्ञानाला जेव्हा प्रत्यक्ष अनुभवाची जोड मिळते, तेव्हा ते शिक्षण अधिक समृद्ध आणि कायमस्वरूपी ठरते. शालेय सहलींमुळे विद्यार्थ्यांच्या अनुभवकक्षा रुंदावण्यास मोठी मदत होते. असे मत जवळा (देशमुख ) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर ढवळे यांनी व्यक्त केले. यासाठी बंदिस्त भिंतीच्या आतील अभ्यासक्रम एक दिवस टाळून दरवर्षी सहलीचे आयोजन करण्यात येते. म्हणूनच जवळा (देशमुख ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची सहल तेलंगणातील सुप्रसिद्ध श्रीक्षेत्र बासर येथे आयोजित करण्यात आली होती.
             सहलीदरम्यान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ढवळे बोलत होते. ते म्हणाले की, सहल हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते ‘अनौपचारिक शिक्षणाचे’ एक महत्त्वाचे माध्यम आहे. सहलीमध्ये मित्र-मैत्रिणींसोबत राहिल्याने विद्यार्थ्यांमध्ये सहकार्य, शेअरिंग, नेतृत्व गुण आणि संघभावना विकसित होते. नवीन ठिकाणे, तिथली संस्कृती, झाडे-वेली आणि लोकजीवन पाहिल्यामुळे विद्यार्थ्यांची निरीक्षण करण्याची वृत्ती वाढते.
आत्मविश्वास आणि स्वावलंबन: घरापासून दूर राहिल्यामुळे स्वतःच्या वस्तू सांभाळणे, वेळेचे नियोजन करणे यांतून विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन आणि आत्मविश्वास निर्माण होतो.
 रोजच्या अभ्यासाच्या वेळापत्रकातून थोडा बदल मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक विरंगुळा मिळतो, ज्यामुळे त्यांची एकाग्रता वाढण्यास मदत होते. यावेळी प्राथमिक पदवीधर शिक्षिका संगिता बडवणे, सहशिक्षक संतोष घटकार, विषय शिक्षक उमाकांत बेंबडे, मारोती चक्रधर, मनिषा गच्चे, विश्वजीत पवार आदींची उपस्थिती होती.
              सहलीच्या निमित्ताने एखाद्या विशिष्ट ठिकाणची भौगोलिक तथा ऐतिहासिक माहिती मिळवण्यासाठी लोहा तालुक्यातील जवळा येथील जि. प. शाळेच्या मुलांनी तेलंगणाच्या निर्मल जिल्ह्यातील बासर या ठिकाणी भेट दिली. या ठिकाणांशी संबंधित माहिती मिळवली. प्रत्येक ठिकाणचे वेगळे महत्त्व असते. यामुळे निरीक्षणे तथा माहितीचे संकलन आणि सारणीकरण हे कौशल्य आत्मसात करता आले. विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी प्रेम निर्माण करण्यास आणि त्यांना बाहेरील जगामध्ये खऱ्या आनंदाची ओळख करून देण्यास मदत झाली. यासाठी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. यानिमित्ताने मंदीर संस्थान विश्वस्तांच्या अन्नछत्रात सुग्रास सहभोजनाचा आनंदही मुलांनी घेतला. तसेच ठिकठिकाणी शिक्षकांनी दिलेल्या सूचनांचे विद्यार्थ्यांनी कसे पालन केले पाहिजे याचे खरेखुरे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी घेतले. सहलीच्या स्थळांचे पावित्र्य टिकविणे, कुठलीही नासधूस करु नये, आपल्यासोबतचा कचरा कचराकुंडीतच टाकणे आदी सूचनांचे विद्यार्थ्यांनी तंतोतंत पालन केले.
बासर येथे काय काय पाहिले? 
बासर म्हटले की, ज्ञानसरस्वतीचे भव्य, दिव्य मंदिर डोळ्यासमोर उभे राहते. तसेच तेथील प्रवेशव्दारातील श्रीदत्तात्रेयांची सुंदर, लोभस मूर्ती पण डोळ्यासमोर येते. हे सर्व पाहून सरस्वती मंदिराचा वरील बाजूस श्री कालिका माता मंदिर, श्री व्यास महर्षी गुहा, बासर गावाच्या दिशेला, सरस्वती मंदिराच्या उत्तरेस साधारणतः १.०० कि. मी. असलेल्या श्री एकमुखी दत्त मंदिर त्यापुढील श्री पाप हरेश्वर मंदिर, बासर बस स्टॅन्डच्या बाजूला असलेल्या वेद शिळा तसेच बासर बस स्टॅन्ड ते सरस्वती मंदिर रोडवरील श्री चिंतामणी गणेश मंदिरास भेट दिल्यानंतर शेवटी गोदावरी नदीचा घाटावरील गंगा लक्ष्मी मूर्ती व परिसरास भेट देण्यात आली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!