नांदेड :- शहर व जिल्ह्यातील सलग घडलेल्या तीन गंभीर खून प्रकरणांतील आरोपींविरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करत गुन्हेगारीला आळा घालण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे. आरोपींनी अत्यंत निघृणपणे खून केल्याचे तसेच यापूर्वीही त्यांच्याविरुद्ध विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने या प्रकरणांमध्ये मकोका लागू करण्यात आला आहे. या तिन्ही प्रकरणांचा तपास पोलीस उपअधीक्षक स्तरावरील अधिकाऱ्यांकडे असून न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे. वजिराबाद पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक 181/2026 मध्ये फिर्यादी रोशन सुरेश हळदे यांनी तक्रार दिली आहे. हा गुन्हा 26 एप्रिल 2026 रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडला होता. या प्रकरणात दीपक अर्जुन पवार (24, रा. शिवनगर), रोहित प्रकाश खिल्लारे (19, रा. तानाजीनगर), आकाश गोविंद लुळे (24, रा. तानाजीनगर) आणि पप्पू उर्फ लालबा शेषराव गजलवाड (22, रा. गोपाळनगर) यांना आरोपी करण्यात आले आहे. तर राजेश अंकुश पवार आणि अविनाश नारायण चव्हाण हे अद्याप फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. या गुन्ह्यात 19 मे 2026 रोजी मकोका कायदा लागू करण्यात आला. दुसरे प्रकरण गुन्हा क्रमांक 172/2026 असून त्यात फिर्यादी अनिता गजानन चव्हाण आहेत. या प्रकरणात अरिजितसिंग चव्हाण व अन्य दोघांचा मृत्यू झाला होता. या गुन्ह्यात एकूण 13 आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र मकोका कायदा फक्त चार आरोपींविरुद्ध लागू करण्यात आला आहे. त्यामध्ये साईसिंह उर्फ साईलाला दीपकसिंह गहेरवार (26, रा. सिडको), शेख शाखरुख उर्फ कबुर शेख अजगर (23, रा. महेबुबिया कॉलनी), शेख उबेद शेख अजगर (23, रा. मिल्लतनगर) आणि मोहम्मद इलियास खान उर्फ कालाइल्लू मोहम्मद इस्माईल खान यांचा समावेश आहे. या प्रकरणातील आरोपींविरुद्धही संघटित गुन्हेगारीच्या अनुषंगाने मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तिसरे प्रकरण गुन्हा क्रमांक 184/2026 असून त्यामध्ये रोशन सुरेश हळदे (22), प्रक्षिक उर्फ परशा दिलीप ओढणे (25) आणि चंद्रशेखर उर्फ चंद्या देवराव पाईकराव यांना आरोपी करण्यात आले आहे. तर सोहेल उर्फ चिंदी फेरोज खान पठाण आणि मोहम्मद तौफिक शेख संदलजी हे या गुन्ह्यात फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा तपास बिलोलीचे पोलीस उपअधीक्षक शाम पानेगावकर करीत आहेत. गुन्हा क्रमांक 172 आणि 181 या दोन्ही प्रकरणांचा तपास पोलीस उपअधीक्षक रामेश्वर व्यंजने यांच्याकडे असून न्यायालयाने या दोन्ही गुन्ह्यांतील आरोपींना 8 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर गुन्हा क्रमांक 184 मधील आरोपींना अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एम. शिंदे यांनी मकोका कायद्यानुसार 6 जूनपर्यंत पोलीस कोठडीत पाठविण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, या तिन्ही गुन्ह्यांमधील आरोपींनी अत्यंत क्रूर पद्धतीने खून केले असून त्यांच्याविरुद्ध यापूर्वीही अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. शहर आणि जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, संघटित गुन्हेगारीला आळा बसावा आणि गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊनच संबंधित आरोपींविरुद्ध मकोका कायदा लागू करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या कारवाईमुळे संघटित गुन्हेगारीविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणात सरकार पक्षाच्यावतीने ऍड. यादव तळेगावकर यांनी केलेल्या सादरीकरणाला प्रतिसाद देत न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी दिली. Kanthak Suryatal Post Views: 1,640 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation पैशाच्या वादातून तरुणाचा खून; तीन आरोपी अटकेत उच्च शिक्षणाची शोकांतिका: पात्रता वाढतेय, पण रोजगाराचे दरवाजे बंद का?