नांदेडमध्ये ‘सेक्युलर फोरम’ची स्थापना; स्फोट प्रकरणी CBI/NIA चौकशीची मागणी, देळूक घटनेचाही उल्लेख

नांदेड :– शहरातील वाढत्या सामाजिक व राजकीय ध्रुवीकरणाच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी एकत्र येत ‘सेक्युलर फोरम, नांदेड’ या मंचाची स्थापना केली आहे. दोन दिवसांपूर्वी हॉटेल विसावा येथे झालेल्या बैठकीत या फोरमची घोषणा करण्यात आली असून, पत्रकार परिषद घेऊन त्याबाबतची माहिती देण्यात आली.

फोरमच्या वतीने सांगण्यात आले की, नांदेड जिल्ह्यात धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि संविधानवादी मूल्यांची परंपरा टिकवण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. अलीकडील घटनांमुळे समाजात अविश्वासाचे वातावरण निर्माण होत असल्याने त्याला सामोरे जाण्यासाठी हा मंच स्थापन करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.

दरम्यान, 21 मार्च रोजी जुन्या ईदगाह परिसरात घडलेल्या स्फोटाच्या घटनेचा संदर्भ देत फोरमने गंभीर शंका व्यक्त केली. या घटनेत मोटरसायकलस्वाराचा स्फोट होऊन मृत्यू झाला होता. स्फोटाच्या स्वरूपावरून हा प्रकार संशयास्पद असून संभाव्य दहशतवादी कट असू शकतो, असा दावा करण्यात आला.

फोरमच्या वतीने राज्यपाल व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात येणार असून, त्यात पाच प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. या प्रकरणाची चौकशी CBI किंवा NIA मार्फत करावी, फॉरेन्सिक व टॉक्सिकोलॉजिकल तपास सखोल करावा, तपास पारदर्शक व जबाबदार पद्धतीने करावा, सूत्रधारांचा शोध घ्यावा तसेच स्वतंत्र फॅक्ट-फाइंडिंग कमिटी नेमावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

फोरमच्या सदस्यांनी आरोप केला की, घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळ धुऊन काढल्याने महत्त्वाचे पुरावे नष्ट झाले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक तपास यंत्रणांवर विश्वास उरलेला नसून उच्चस्तरीय चौकशीची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

देळूब घटनेचाही उल्लेख; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न

पत्रकार परिषदेत अर्धापूर तालुक्यातील देळूब येथील घटनेचाही उल्लेख करण्यात आला. फोरमच्या प्रतिनिधींनी सांगितले की, एका युवकाने मशिदीसमोर जाऊन अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याने तणाव निर्माण झाला होता. संबंधित युवक प्रशिक्षित असल्याचा संशय व्यक्त करत त्याचे काही फोटोही उपलब्ध झाल्याचा दावा करण्यात आला.

या प्रकरणात स्थानिक नागरिकांनी विचारणा करण्यासाठी गेल्यानंतर सुमारे 59 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेत पोलिसांनी तात्काळ कारवाई केली; मात्र वाजेगाव स्फोट प्रकरणात अपेक्षित प्रतिसाद दिसून आला नाही, असा आरोप करत फोरमने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

फोरमच्या मते, दोन्ही घटनांमधील कारवाईतील फरकामुळे नागरिकांच्या मनात संशय निर्माण होत असून, निष्पक्ष व पारदर्शक तपासाची गरज अधोरेखित होते.

या फोरममध्ये काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, माकप, समाजवादी पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट, मनसे, जनता दल (सेक्युलर) आदी पक्षांचे प्रतिनिधी तसेच विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

पत्रकार परिषदेत नेत्यांनी सांगितले की, प्रशासनाने योग्य प्रतिसाद न दिल्यास पुढील काळात आंदोलनात्मक भूमिका घेतली जाईल. तसेच जनतेपर्यंत सत्य परिस्थिती पोहोचवून लोकमताच्या माध्यमातून प्रशासनावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल.

फोरमच्या वतीने नागरिकांना शांतता राखण्याचे व अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!