पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत अवैध गुटखा विक्री व साठवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार २३ मार्च रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी हिमायतनगर तालुक्यातील पोटा बु. येथील पोटा मस्जिद शेजारच्या परिसरात छापा टाकला.
या छाप्यात सैय्यद सत्तार सैय्यद खादर (वय ४८, रा. पोटा बु., ता. हिमायतनगर) याच्या ताब्यातून गोवा १००० पान मसाला, जर्दा, बाजीराव पान मसाला, कॅश गोल्ड व इतर सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आढळून आला. हा सर्व माल बेकायदेशीररित्या साठवून विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे स्पष्ट झाले. या कारवाईत एकूण ४.८८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीविरुद्ध संबंधित कायद्यांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी डी.एस. हाके नेतृत्वाखाली हिमायतनगर पोलीस निरीक्षक अमोल भगत,सहायक पोलीस निरीक्षक विशाल वाठोरे,पोलीस उप निरीक्षक मिलिंद कात्रे,श्याम नागरगोजे,पोलीस अंमलदार बालाजी पाटील,सपना सूर्यवंशी यांनी केली. या यशस्वी कारवाईमुळे परिसरात अवैध गुटखा व्यवसायावर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
