सांस्कृतिक कार्य विभागाच्या “मोगरा फुलला” या कार्यक्रमास नांदेडकरांचा उदंड प्रतिसाद – सभागृह केले हाऊसफुल नांदेड (प्रतिनिधी)- संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने प्रख्यात प्रभोधनकार श्री. गणेश शिंदे यांच्या सुश्राव्य वाणीतून “ज्ञानियांचा राजा – मोगरा फुलला” या विशेष आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन दि. १८ मार्च रोजी कुसुम सभागृह येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमास नांदेडकरांचा प्रचंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमात भक्तिमय वातावरणाची अनुभूती उपस्थितांना मिळाली. या कार्यक्रमासाठी उदघाटक म्हणून लाभलेल्या नांदेड चे जिल्हाधिकारी श्री. राहुल कर्डीले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. संत ज्ञानेश्वर माऊली यांनी भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी) या महान ग्रंथाद्वारे अध्यात्म, समता, प्रेमभाव आणि मानवतेचा संदेश सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवला. त्यांच्या विचारांनी महाराष्ट्रातील वारी परंपरा, संत साहित्य आणि समाजातील ऐक्यभाव अधिक दृढ केला आहे हे प्रभोधनकार गणेश शिंदे यांनी प्रभाविपणे मांडले. यानंतर अभंग, प्रवचन तसेच सांस्कृतिक सादरीकरणांद्वारे संत ज्ञानेश्वरांच्या जीवनकार्याचा व विचारांचा वेध घेण्यात आला. “मोगरा फुलला” या संकल्पनेतून अध्यात्म, भक्ती आणि संस्कृती यांचा सुंदर संगम साकारण्यात आला. या प्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत संत परंपरेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. संत ज्ञानेश्वरांनी दिलेला समानता, मानवता आणि अध्यात्माचा संदेश आजही तितकाच प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमात विविध कलाकारांनी सादर केलेल्या अभंग व भजनांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमात रसिक नंतर एवढे मंत्रामुग्ध झाले कि रसिकांना अनेक दर्जेदार अभंग सादर करणाऱ्या गायिका सन्मित्रा शिंदे यांच्या अभंगावर रसिकांनी ठेका धरत ज्ञानेश्वर माऊली च्या जायघोषणे संपूर्ण सभागृह भक्तीमय केले. सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री मा. श्री. ॲड. आशिष शेलार यांच्या यांच्या संकल्पनेतून व तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव श्री. डॉ. किरण कुलकर्णी व संचालक श्रीराम पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. सूंदर सादरीकरण, प्रभावी रंगमंच व्यवस्था, सभागृह परिसरात अध्यात्मिक वातावरण निर्मिती व अचूक नियोजनाच्या या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे नांदेड मध्ये अध्यात्मिक वर्ग, संगीत व सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणारे कलावंत, तरुण वर्ग व इतर सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. Kanthak Suryatal Post Views: 622 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation राष्ट्रीय पॅरा ॲथेलेटिक्स चॅम्पिअनशीप स्पर्धेत भाग्यश्री जाधव ठरली दोन सुवर्ण पदकांची मानकरी उच्च विद्याविभूषित सिद्धहस्त सर्जन डॉ.समीर कदम यांचे निधन