नांदेड (प्रतिनिधी) -येथील दोनकलवार परिवारातील लोकप्रिय व कर्तव्यदक्ष अधिकारी पंडित नारायण दोनकलवार (वय 53) यांचे दिनांक 20 मार्च 2026 रोजी मुंबई येथील डोंबिवली रेल्वे स्थानकावर झालेल्या अपघातात दुःखद निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार, ते मुंबई येथे मत्स्य विभागात मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी म्हणून बांद्रा येथे कार्यरत होते. रविवारची सुट्टी असल्यामुळे ते आपल्या गावी नांदेड येथे जाण्यासाठी निघाले होते. ते नांदेड करिता राजाराणी एक्सप्रेस पकडण्यासाठी लोकल ट्रेनमध्ये चढत असताना त्यांचा तोल जाऊन हात निसटला व ते रेल्वेखाली पडून डोक्याला जबर मार लागला या दुर्दैवी अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अलीकडेच त्यांच्या कुटुंबात त्यांच्या काकांचे निधन झाले होते. त्यामुळे त्यांच्या कन्या कुमारी पायल हिचा 09 मार्च रोजी होणारा साखरपुडा पुढे ढकलण्यात आला होता. सदर साखरपुडा समारंभ आता दिनांक 25 मार्च 2026 रोजी सकाळी 11:30 वाजता वामनराव पावडे मंगल कार्यालय, नांदेड येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या तयारीसाठीच ते गावी जात होते,अशी माहिती समोर आली आहे. त्यांच्या पश्चात त्यांना पत्नी, एक मुलगी, एक मुलगा,भाऊ,बहीण तसेच आई-वडील असा मोठा परिवार आहे. अवघ्या महिन्याभरात दोन दुःखद घटना घडल्यामुळे दोनकलवार परिवारावर शोककळा पसरली आहे. अंत्यविधी आज त्यांच्या नांदेड येथे सायंकाळी पार पडणार आहे. कै.पंडित दोनकलवार यांच्या अकाली निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,123 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation इराण–अमेरिका संघर्ष: २२ दिवसांनंतरची बदलती दिशा रमाजन ईद उत्साहात साजरी