नांदेड (प्रतिनिधी)- दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी व रेल्वे प्रवास अधिक शिस्तबद्ध करण्याच्या उद्देशाने 09 मार्च 2026 रोजी सकाळी 04:00 ते सायंकाळी 20:00 या कालावधीत विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेत बस रेड व रोड चेक्स देखील करण्यात आले.
ही मोहीम सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक श्री शैलेश कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत 34 तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला व विभागातील विविध मार्गांवरील एकूण 23 गाड्यांची तपासणी करण्यात आली. विशेषतः बस रेड व रोड चेक्सवर भर देत सर्व पथकांनी विनातिकीट किंवा अनियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा शोध घेण्यासाठी सक्रिय सहभाग घेतला.
या मोहिमेदरम्यान 527 विनातिकीट प्रवास (TWT) प्रकरणे आढळून आली असून त्यातून भाडे म्हणून ₹1,29,545 आणि दंड म्हणून ₹1,32,150 अशी वसुली करण्यात आली. तसेच 37 अनियमित प्रवास (IRT) प्रकरणे आढळून आली असून त्यातून भाडे म्हणून ₹7,780 व दंड म्हणून ₹9,250 अशी वसुली झाली. याशिवाय 80 अनबुक्ड लगेज (UBL) प्रकरणे नोंदवून ₹12,710 इतकी वसुली करण्यात आली.

एकूण 644 प्रकरणे नोंदविण्यात आली असून या कारवाईतून एकूण ₹2,91,435 इतकी वसुली करण्यात आली.
रेल्वे नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी तसेच प्रामाणिक प्रवाशांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी अशा प्रकारच्या विशेष मोहिमा नियमितपणे राबविण्यात येतात.
रेल्वे प्रशासन सर्व प्रवाशांना विनंती करते की त्यांनी केवळ वैध तिकीट किंवा अधिकृत प्रवास परवानगीसहच प्रवास करावा तसेच अनबुक्ड सामान घेऊन प्रवास टाळावा. प्रवाशांनी तिकीट बुकिंगसाठी अधिकृत प्लॅटफॉर्म जसे की RailOne app यांचा वापर करावा.
नांदेड विभाग सुरक्षित, शिस्तबद्ध व प्रवासी-अनुकूल प्रवास वातावरण राखण्यासाठी कटिबद्ध आहे.

