देगाव येथे बेकायदेशीर दारू विक्री प्रकरणात पोलिसांवर धक्काबुक्की; चौघांविरुद्ध गुन्हा

अर्धापूर (प्रतिनिधी) – अर्धापूर तालुक्यातील देगाव येथे बेकायदेशीर दारू विक्रीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकास धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ३ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास देगाव येथील शौर्य हॉटेलच्या पाठीमागे बेकायदेशीर देशी-विदेशी दारू विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस पथकाने तेथे छापा टाकला. यावेळी आरोपी सतीश पंडितराव कदम (वय ३६), पिंटू बंकेटी कदम (वय ३८), विठ्ठल पंडितराव कदम आणि शिवम शंकर ठाकरे (वय ३१, सर्व रा. देगाव, ता. अर्धापूर) हे विनापरवाना देशी-विदेशी दारूचा साठा ठेवून विक्री करताना आढळून आले.
पोलिसांनी सुमारे २,६७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मात्र कारवाईदरम्यान आरोपी व त्यांच्या साथीदारांनी एकत्र येऊन पोलिसांशी धक्काबुक्की करत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
याप्रकरणी फिर्यादी सहायक पोलीस निरीक्षक कर्मचारी चिंतामण ग्यानोबा ठमकेवाड यांच्या तक्रारीवरून अर्धापूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ११३/२०२६ अंतर्गत भादंवि कलम 132, 224, 351(3), 189(2) तसेच बीएनएस-2023 आणि महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65 (ई), 68 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कन्हाळे हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!