महापालिकेसाठी रात्री उशीरापर्यंत मतदारांच्या रांगा ; 61 टक्के मतदान

उद्या मतमोजणी,पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त

नांदेड(प्रतिनिधी)-प्रदीर्घ कालावधीच्या नंतर महानगरपालिका निवडणुकीचा मुहूर्त न्यायालयाच्या आदेशानंतर 15 जानेवारी रोजी काढण्यात आला आणि राज्यातील महानगरपालिकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. नांदेड महानगरपालिकेसाठी रात्री उशीरापर्यंत अनेक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा असल्याचे चित्र दिसून येत होते. एकंदरीत 61 टक्के मतदान  झाले. उद्या दि.16 रोज शुक्रवारी सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरूवात होणार आहे.

नांदेड महानगरपालिकेसाठी 20 प्रभांगातील 81 जागांसाठी 491 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. यांचे भवितव्य दि.15 रोज गुरुवारी मशिनमध्ये बंद झाले. दि.16 रोज शुक्रवारी सकाळी 10 वाजता शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या प्रांगणात मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. शहरातील अनेक भागात काही वेळ तणाव निर्माण झाला होता. पण पोलीस प्रशासनाच्या चोख बंदोबस्तामुळे कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. तणावपुर्ण शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली असून उद्या मतमोजणी असल्याने पोलीस प्रशासनानेही पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात केला आहे.

महानगरपालिका मतदानासाठी खा.अशोक चव्हाण, आ.हेमंत पाटील, आ.बालाजी कल्याणकर, माजी आ.अमिताताई चव्हाण, माजी आ.अमरनाथ राजूरकर, माजी आ.ओमप्रकाश पोकर्णा, भाजपा संघटनमंत्री संजय कौडगे, माजी महापौर शैलजा स्वामी, शिलाताई भवरे, जयश्री पावडे, मोहिनी येवनकर, अब्दुल सत्तार, माजी उपमहापौर सतिश देशमुख, विनय गिरडे, शमीम अब्दुल्ला, आनंद चव्हाण यांच्यासह आदींनी आपला मतदानाचा हक्क बजावला. प्रभाग 7, 8,11, 12 या प्रभागात मतदानाची टक्केवारी अधिक आहे. मतदानाची टक्केवारी कमी झाल्यामुळे लोकशाहीच्या उत्सवात मतदारांनी अधिकचा सहभाग न नोंदवल्यामुळे अनेक जाणकारांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी प्रभावीपणे यंत्रणा राबविणे गरजेचे होते असेही मत नंादेड शहरातील अनेक नागरीकांनी व्यक्त केले.

प्रभाग क्रमांक 1 मधील मतदान मशिन तांत्रिक बिघाडीमुळे बंद पडल्यामुळे या ठिकाणी काही वेळ मतदान प्रक्रिया बंद पडली होती. मात्र पुन्हा या बुथवर मतदान प्रक्रिया सुरू झाली. पण काही वेळ मतदान प्रक्रिया बंद पडल्यामुळे उमेदवारांसह प्रशासनाची तारांबळ उडाली होती. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!