७४ हजार कोटींचा अर्थसंकल्प असलेली, आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका मुंबई महानगरपालिका आज मतदानाच्या रणांगणात उतरलेली आहे. ही केवळ एक निवडणूक नाही, तर मुंबई कोणाची? हा थेट प्रश्न आहे. मुंबई भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात जाणार की ठाकरे बंधूंच्या हाती राहणार, याचा फैसला आज जनतेच्या हातात आहे.
बाळासाहेब ठाकरे एकदा म्हणाले होते, “उठाव लुंगी आणि बजाव पुंगी” आज तसाच काहीसा उठाव घडणार का? राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात दाखवलेला तो चार मिनिटांचा व्हिडिओ मुंबईकरांच्या काळजात झिरपेल का? तो व्हिडिओ दाखवला जात असताना पाच लाखांहून अधिक लोकांची जनसभा ज्या प्रकारे स्तब्ध झाली होती, त्यातून जनतेच्या मनात खदखदणारा राग स्पष्ट दिसत होता. त्या व्हिडिओत २०१४ मध्ये महाराष्ट्र काय होता, आज काय आहे, २०१४ मध्ये अदानी कोण होता आणि आज तो काय झाला याचे विदारक वास्तव उघड केले गेले.
महाराष्ट्र स्वतंत्र झाल्यावर मुंबई महाराष्ट्रात यावी की गुजरातला, यासाठी रक्तरंजित आंदोलन झाले. अनेक हुतात्म्यांनी प्राणांची आहुती दिली, तेव्हा कुठे मुंबई महाराष्ट्रात आली. पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या काळातसुद्धा मुंबई गुजरातला नेण्याचे कारस्थान सुरू होते. तेव्हा जमले नाही, पण आजची परिस्थिती वेगळी आहे का? नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोन सत्ताधीशांना मुंबई गुजरातला नेता आली नाही, तरी ती गुजरातच्या उद्योगपतींच्या हातात देण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि तो प्रयत्न म्हणजे सर्व काही अदानीच्या घशात घालणे.
मराठी माणसाच्या भावनांवर खेळलेले ठाकरे बंधूंचे भाषण मुंबईकरांना जागं करणार का, की पैशांच्या जोरावर लढणारी आर्थिकदृष्ट्या बलाढ्य भारतीय जनता पार्टी पुन्हा डाव साधणार हे काही दिवसांत स्पष्ट होईल. कारण मुंबई महानगरपालिकेची मतमोजणी उशिरा होणार आहे. तेव्हाच ठरेल मुंबईचा पुढचा किंग कोण?

या निवडणुकीत मतदारांच्या हातात प्रचार साहित्याबरोबरच पैसेसुद्धा पोहोचले याचे अनेक व्हिडिओ पुरावे उपलब्ध आहेत. मुंबईच्या गल्लीबोळांत स्टेज उभारून त्यावर बार डान्सर नाचत आहेत, आणि त्याच स्टेजवर छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा दिसतात ही सरळसरळ विटंबना नाही तर काय?
‘लाडकी बहीण’ योजनेच्या नावाखाली संक्रांतीला तीन हजार रुपये देण्याच्या जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च झाले. काही महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले, पण त्या पैशांवर कापलेला कमिशन आणि प्रचाराचा खर्च पाहता हा सरळसरळ मतांची खरेदीच आहे. मुंबईभर लावलेले प्रचंड होर्डिंग, महिन्याला लाखो रुपयांचे भाडे या सगळ्याचा हिशोब कुणी विचारायचा?
निवडणूक आयोग कागदोपत्री खर्चाची मर्यादा दाखवतो, पण प्रत्यक्षात भारतीय जनता पार्टीसाठी सर्व काही माफ आणि विरोधकांसाठी आचारसंहिता, कायदे, कारवाई! शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना घरोघरी पैसे वाटण्याचा जणू परवाना मिळालेला आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसाच्या अस्मितेला हात घातला आहे. ही भावना जर पेटली, तर कोट्यवधी रुपये ओतूनसुद्धा भाजपचा पराभव अटळ आहे. मुंबईत मुस्लिम मतदारांची संख्या मोठी आहे, आणि भाजपच्या एकूण कारभारामुळे त्यांच्या मनात भाजप हरावी, हाच भाव आहे. हा भाव कायम राहिला, तर ते ठाकरे बंधूंच्या बाजूने उभे राहतील.
२०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेला ८४, भाजपला ८२, काँग्रेसला ३१, राष्ट्रवादीला ९, समाजवादी पक्षाला २ आणि एमआयएमला २ जागा मिळाल्या होत्या. तेव्हा शिवसेना एक होती, आज ती फुटलेली आहे. त्यामुळे ८४ जागा पुन्हा मिळतील असे ठामपणे सांगता येणार नाही, पण ७५–८० जागा जरी मिळाल्या तरी भाजपला सत्तेपासून दूर ठेवता येईल.
भाजपचे गणित स्पष्ट आहे. ९० जागा स्वतःच्या बळावर आणि उरलेल्या शिंदे गटाच्या मदतीने बहुमत. म्हणूनच मुंबईत शिंदे गटाशी युती आहे. भाजपचे काही नेते तर थेट १६०–१७० जागांचे दावे करत आहेत. पाहूया वास्तव काय सांगते.
भाजप जिंकली तरी आम्ही सांगू ती कशी जिंकली, आणि ठाकरे बंधू जिंकले तरी आम्ही सांगू ते कसे जिंकले.
मतदारांना हार्दिक शुभेच्छा कारण आज मुंबईचे भविष्य तुमच्या हातात आहे.
