परवा चुकीचं बटन, उद्या पाच वर्षे रडणं! नांदेडची निवडणूक नव्हे, सत्ता लिलावात!  

मर्जीतला महापौर, मजबूर जनता! व्यवस्थापन गुरूंचा डाव : नांदेडची सत्ता पुन्हा एकहाती? 

महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता संपलेला आहे. अवघ्या ३६ तासांत मतदान सुरू होणार असून, मतदान संपल्यानंतर १२ तासांत मतमोजणी सुरू होईल. नांदेडच्या २० प्रभागांतून ८१ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत.
या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना (उद्धव ठाकरे गट), शिवसेना (एकनाथ शिंदे गट), एमआयएम, मराठवाडा विकास आघाडी तसेच अपक्ष उमेदवार मैदानात उतरले आहेत.

आपला उमेदवार जिंकावा यासाठी करायच्या,न करायच्या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या आहेत आणि उरलेल्या ३६ तासांतही त्या सुरूच राहतील. कारण हे ३६ तासच सत्तेची दिशा ठरवतात. या काळात नेहमीप्रमाणे पैशांची देवाण-घेवाण होणारच. काही व्यवहार झाले असतील, काही बाकी असतील; पण एक गोष्ट मात्र ठामपणे सांगता येते नांदेडचा महापौर खा.अशोक चव्हाण यांच्या मर्जीतलाच असणार. मागील दोन महानगरपालिका निवडणुकांचा अभ्यास केला, तर हे चित्र पुन्हा दिसेल, याबाबत आमचा अंदाज नाही तर ठाम मत आहे. खा. अशोक चव्हाण हे व्यवस्थापनाचे पदवीधर आहेत आणि निवडणूक व्यवस्थापन त्यांना अत्यंत चोख जमते. मागील दोन निवडणुकांत त्यांनी ६० पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणले, म्हणजेच दोन महानगरपालिकांवर त्यांची एकहाती सत्ता होती.

आज परिस्थिती बदलली आहे. त्यांनी पक्ष बदललेला आहे. आता बदललेल्या पक्षाला ताकद दाखवण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे आणि ती ताकद दाखवण्यासाठी ते काहीही करतील, असा विश्वास वाटतो. कारण ते तसे करू शकले नाहीत, तर त्यांची राजकीय प्रतिष्ठा नेमकी कुठे उरेल?

मागील काळात “हे सगळे आमचेच आहेत” असे दाखवून भारतीय जनता पार्टीची ताकद वाढल्याचे दावे झाले. मात्र २००८ पासून आजपर्यंत झालेल्या खर्चाबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे कधीच मिळाली नाहीत. त्यामुळे त्यांनी मांडलेले मुद्दे खरे की खोटे, हे ठरवण्याचे काम विरोधकांनी केले आणि ते मुद्दे त्यांनी खोडून काढलेही. पण या सगळ्यात आमचा मुद्दा वेगळा आहे. नांदेडच्या सामान्य नागरिकाला जगता येईल असे शहर आम्हाला हवे आहे. आम्हाला इंदूर नको, आम्हाला ‘स्मार्ट सिटी’चे गाजरही नको. पण आम्हाला शुद्ध पाणी, चालण्यायोग्य रस्ते, नियमित वीजपुरवठा, सक्षम ड्रेनेज आणि मूलभूत नागरी सुविधा हव्यात.

ही जबाबदारी ज्याच्यावर आहे त्या महानगरपालिकेला चालवू शकणारा, जनतेला सामोरा जाणारा आणि समस्यांचे उत्तर देणारा प्रतिनिधीच निवडून द्यावा, ही आमची ठाम भूमिका आहे. “बाबा, आमच्याही अडचणी आहेत; त्या सोडवा,” असे हक्काने सांगता येईल अशाच व्यक्तीला मतदान करा.

एका भाषणात अशोक चव्हाण यांनी “मटण खा कोणाचेही, पण बटन दाबा कमळाचे” असे वक्तव्य केले. ते ऐकून वाईट वाटले. इतक्या खालच्या पातळीवरची भाषा वापरण्याची वेळ तुम्हावर का यावी? मटणाच्या पार्ट्या तुमच्या पक्षानेही दिल्या आहेत; लोकांनी त्या खाल्ल्याही आहेत. मग इतरांच्या मतांवर किंवा पोटावर बोलण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?

नांदेडवर तुमचे परंपरागत प्रेम आहे, हे आम्ही नाकारत नाही.
पण विरोधक जे प्रश्न उपस्थित करतात, त्यांची उत्तरं दिली जात नाहीत; आमचे प्रश्नही अनुत्तरितच राहतात. कायदेशीर बंधन नसेलही, पण नांदेडच्या नागरिकांच्या हिताचा विचार करणे हे तुमचे कर्तव्य आहे. त्या कर्तव्यापासून दूर जाऊ नका. 
तुमचे लोक जास्त संख्येत निवडून येतील, यात शंका नाही. पण काम करण्याची ताकद, निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आणि प्रामाणिकपणा त्यांच्यात रुजवणे ही जबाबदारी तुमचीच आहे.

अलीकडेच एका मुलाखतीत देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे यांनी सांगितले की मतदान रोखण्यासाठी मुस्लिम समाजात पैशांचे वाटप करून, हातावर शाई लावण्याचे प्रकार झाले. असे प्रकार या निवडणुकीत घडले असतील, तर नांदेडमध्ये घडू शकत नाहीत, असे कोणत्या आधारावर म्हणायचे? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नांदेडमध्ये म्हणतात “नांदेडचा विकास झाला नाही.” हा प्रश्न स्वतःलाच विचारला पाहिजे. तरीही आज तुम्ही त्या पक्षात आहात, म्हणून त्यांचे नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणे तुमचे कर्तव्यच आहे.

फक्त एकच विनंती  पैशांच्या व्यवहारात गडबड होऊ देऊ नका. “इतका खर्च झाला” असे सांगितले जाईल, प्रत्यक्षात अर्धाच खर्च झालेला असेल. मग उरलेला हिशोब कोण ठेवणार? तुम्ही व्यवस्थापनगुरू आहातच.  म्हणूनच आम्हाला खात्री आहे की कोणत्याही परिस्थितीत भाजपचाच, तुमच्या मर्जीतलाच महापौर नांदेडला मिळेल. पण या बदललेल्या राजकारणात तुम्ही बदलू नका, हीच आमची अपेक्षा आहे. माननीय स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेबांवर नांदेडच्या जनतेचा जो विश्वास होता, ते प्रेम आजही कायम आहे. तुम्ही भाजपमध्ये गेलात म्हणून ते प्रेम कमी झालेले नाही. आता उरलेल्या ३६ तासांत काय करता येईल ते करा,“तुमच्या पक्षाचीच माणसे ‘पैसे घ्या, पक्षानेच पाठवले आहे’ असा प्रचार करत असल्याचे सर्वांना माहीत आहे. मुस्लिम महिलांनाही कमळाच्या दस्त्या घालून प्रचारासाठी वापरले आहेच ना  मग अशा परिस्थितीत विरोध कसा होणार, आणि कोण करणार? त्यामुळे तुमचा विजय सुरक्षित असल्याचा आत्मविश्वास आम्हाला आहे, आपणास असणे हे स्वाभाविकच आहे. मात्र या विजयामागे जे घटनाक्रम घडत आहेत, त्याकडे एकदा तरी गांभीर्याने पाहावे, ही अपेक्षा आहे. नांदेडच्या जनतेसाठी आवश्यक असलेली कामे प्रामाणिकपणे व्हावीत, हीच खरी मागणी. उरलेले तुम्ही काय करता किंवा तुमची माणसे काय करतात, याच्याशी आमचा कोणताही संबंध नाही.”

पण शेवटी निर्णय जनतेचाच असेल.. 

जनतेला आमचे स्पष्ट आवाहन उमेदवारांचा इतिहास पहा, त्यांच्या कामाची ताकद तपासा, त्यांच्या बोलण्यामागची जबाबदारी ओळखा. पुढील पाच वर्षे तुमच्या समस्यांसाठी जो वेळ देईल, त्यालाच मतदान करा.कारण चुकीचा निर्णय घेतला,

तर पुढची पाच वर्षे फक्त अश्रू उरतील—आणि पश्चात्ताप.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!