नांदेड – महाराष्ट्र मद्य निषेध कायदा 1949 चे कलम 142 (1) व महाराष्ट्र विदेशी मद्य (रोखीने विक्री, मद्यविक्री नोंदवही इ.) नियम 1969 चे संबंधीत अनुज्ञप्त्या कलमान्वये प्रदान अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी नांदेड जिल्ह्यात सर्व मद्य विक्री करणाऱ्या अबकारी (एफएल-1, एफएल-2, एफएल-3, एफएल-4, एफएलबिआर 2, सीएल-2, सीएल-3 व ताडी अनुज्ञप्ती इ.) पुढील दिवशी बंद ठेवण्याचे आदेश पारीत केले आहेत.
कोरडा दिवस पाळावयाचे कारण नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 मतदानाच्या आधीचा दिवस म्हणजे बुधवार 14 जानेवारी 2026 रोजी सकाळी 6 वाजेपासून मद्य विक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्यात येणार असून त्याचे क्षेत्र नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हद्द (संपूर्ण दिवस सकाळी 6 वाजे पासून) राहील. तसेच गुरूवार 15 जानेवारी 2026 रोजी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 मतदानाचा दिवस- मद्य विक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्यात येणारे क्षेत्र नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हद्द (संपूर्ण दिवस) राहील. तर गुरूवार 16 जानेवारी 2026 रोजी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या मतमोजणीचा दिवस नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हद्द (संपुर्ण म.न.पा. हद्दीतील मतमोजणी प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत) हा आदेश लागू राहील.
याप्रमाणे नमुद केलेल्या दिवशी सर्व उल्लेखित अनुज्ञप्ती बंद ठेवायच्या असून त्याबाबत नुकसान भरपाई दिली जाणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांविरुध्द महाराष्ट्र मद्यनिषेध अधिनियम 1949 व त्या अंतर्गत असलेल्या नियमांतर्गत तरतुदीनुसार कडक कारवाई केली जाईल, याची नोंद घ्यावी, असेही आदेशात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्पष्ट केले आहे. महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 अंतर्गत नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकासाठी गुरूवार 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून मतमोजणी शुक्रवार 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे. त्याअनुषंगाने नियमातील तरतुदीनुसार मतदानाच्या दिवशी व मतदानाच्या अगोदरच्या दिवशी तसेच मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्री मनाई / कोरडा दिवस जाहीर करण्याबाबत कार्यवाही करण्याबाबत निर्देशित केले आहे. त्याबाबतची तरतुद लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 135 (सी) अन्वये करण्यात आली आहे. सदरील दिवशी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याकरीता दक्षता घेणे आवश्यक आहे, असेही आदेशात स्पष्ट केले आहे.
