“खांद्यावरचे स्टार्स… अंधारमय जीवन प्रकाशित करण्यासाठी…”
पुस्तकाचे नाव “खांद्यावरचे स्टार्स” असे वाचले आणि आकर्षक मुखपृष्ठ पाहिले की, आपल्या संवेदनशील मनाला लगेच जाणीव होते ती खाकी वर्दीची आणि “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” या ब्रीदवाक्याची! मुखपृष्ठावरील खाकी वर्दी आणि पांढरा शुभ्र पक्षी… खरंतर समजणाऱ्याला बरेच काही सांगून जाते. मलपृष्ठावर लोकबिरादरी प्रकल्पाचे प्रकाशवड, ज्यांनी अनेकांच्या जीवनात प्रकाश आणला असे डॉ.प्रकाश बाबा आमटे व दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री.यजुवेंद्र महाजन यांनी पुस्तकाचा मतितार्थ अत्यंत मोजक्या शब्दात व्यक्त केला आहे.
अंधारमय जीवन प्रकाशित करण्यासाठी खांद्यावरचे स्टार्स त्यांचे कार्य आणि कार्याप्रती असलेली समर्पण वृत्ती आपल्याला सुरुवातीलाच “समर्पण” मध्ये दिसून येते. “सावधान”पासून शिस्त अंगी बाणवणाऱ्या व साहसी वृत्तीने बदल घडवत क्षणोक्षणी जीवन समृद्ध करून टाकणाऱ्या ईश्वरी ऊर्जा स्त्रोतास हे पुस्तक समर्पित केले आहे.
पुस्तकाला श्री.ज्ञानेश्वर मुळे, अध्यक्ष, अभिजात भाषा पुरवठा समिती तथा राष्ट्रीय मानवाधिकार आयोग सदस्य, माजी केंद्रीय परराष्ट्र सचिव यांची प्रस्तावना लाभलेली आहे, जी अत्यंत बोलकी आहे. पुस्तकामध्ये एकूण 21 प्रकरणांची कार्यानुभवावर आधारित विभागणी केली आहे. त्यातील पहिली 20 प्रकरणे ही कर्तव्य बजावताना आलेल्या अनुभवांची आहेत तर शेवटचे 21 वे प्रकरण हे लेखकाच्या स्वतःच्या संदर्भातील आहे.
एरवी आपण पोलिसांना कितीही नावे ठेवत असलो, शिव्या- श्राप देत असलो तरीही आपल्यावर अन्याय झाला की आपल्याला पहिली आठवण होते ती पोलिसांची! अति आनंद, दुःखद प्रसंग, अपघात, अन्याय, फसवणूक या व इतर अनेक बाबींसाठी शेवटी येऊन थांबतो ते आपण पोलिसांजवळ! पोलिसांना खूप सारे अनुभव येत असतात आणि ते त्या अनुभवातून समृद्ध होत जातात. अशाच समृद्ध अनुभवातून लेखकाने “खांद्यावरचे स्टार्स” या पुस्तकात आलेले अनुभव आपल्यापुढे मांडले आहेत. सोशल मीडियाचा सकारात्मक वापर हा या पुस्तक लिहिण्याचा पाया म्हटले तर वावगे ठरणार नाही. समाज माध्यमातून मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रिया नेच त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली आणि आपल्यापुढे समृद्ध अनुभव देणारे खांद्यावरचे स्टार्स हे पुस्तक निर्माण झाले.
कोणतीही सेवा असो, ती करत असताना विविध प्रकारचे अनुभव येत असतात. ते कधी सुखद तर कधी दुःखद असतात आणि त्यामुळेच सेवा करणारा त्यातून समृद्ध होत असतो. काम करताना आलेले अनुभव सर्वांनाच शब्दात मांडता येतील असे नाही, परंतु लेखकाने त्यांना आलेले अनुभव प्रामाणिकपणे अत्यंत कुशलतेने, ओघवत्या, सहज व सोप्या भाषेत पुस्तकात मांडले आहेत. लेखक इथे प्रामाणिकपणे कबूल करतात की, “मी प्रतिनिधी आहे समर्थ पोलीसजनांचा आणि ज्यांच्या खांद्यावर ”स्टार्स” लागलेले आहेत त्यांचा. मी प्रतिनिधी आहे पोलिसांव्यतिरिक्त प्रशासनातील इतर विभागाचा, ज्यांच्याकडे मूर्त स्वरूपात ”स्टार्स” नसले तरी आपल्या प्रशासकीय कर्तव्याच्या सहाय्याने हजारो- लाखो जणांचे स्टार्स चमकवण्याचे म्हणजेच भाग्य चमकवण्याचे सामर्थ्य – अधिकार आहेत. म्हणूनच ‘ आमचे खांदे स्टार्स लावण्यासाठीच ‘ आहेत.”
नक्षलग्रस्त गोंदिया येथे उपविभागीय पोलीस अधिकारी अर्थात डीवायएसपी म्हणून खाकी वर्दीच्या प्रवासाला सुरुवात होते. आत्मसमर्पण या पहिल्याच प्रकरणात नक्षलवादामध्ये भरकटत जाणाऱ्या युवकाबद्दल लेखक म्हणतात की, “जगाने उपेक्षा केलेल्या विचारांची कास धरून, क्रांतीची आस बाळगून बसलेले हे आपलेच परंतु वाट चुकलेले युवक!” आणि या युवकांचा प्रतिनिधित्व करणारा युवक म्हणजे दिलेर जो पोलिसांनी केलेल्या प्रयत्नातून पोलिसांसमोर आत्म समर्पण करतो आणि नक्षलवादाच्या वाहवत चाललेल्या प्रवाहापासून वाचतो झोप पुढे विशेष पोलीस अधिकारी म्हणून देखील कार्य करतो.
मालेगाव मधील भवानी दादा… गुंडगिरीचा मार्ग सोडून समाजमान्य मार्ग अवलंबतो तो फक्त पोलिसाला असलेल्या त्याच्या अवांतर ज्ञानामुळे! पुलिस की दुवाॅं नाव दिलेली हातगाडी त्याच्या जीवनाचा चेहरामोहरा बदलून टाकते. मुलीच्या वाढदिवसानिमित्त अजान आणि आरतीचा केलेला अनोखा मिलाप..!
धर्माविषयी बोलताना लेखक म्हणतात की, “धर्म म्हणजे तरी काय? तर धारणा! सामाजिक आणि भौगोलिक परिस्थितीनुसार त्या त्या कालखंडात तयार झालेल्या चांगुलपणाच्या धारणा म्हणजे धर्म. खरे तर सर्वधर्म सारखेच. कुरान शरीफ मधील रुह, गीतेमधील आत्मा, बायबल मधील सोल एकच! जन्नत, स्वर्ग, हेवन; जहन्नुम, नरक, हेल यांना वेगळे कसे म्हणायचे? परी, फरिश्ता, एंजल; परमधाम, आलम- ए- आरवा, स्विट होम किंवा प्रलय- कयामत – डिस्ट्रक्शन, दानव, शैतान, डेव्हिल ह्या काही वेगळ्या गोष्टी नाहीतच. ईश्वर, अल्लाह, गॉड ही एकाच परमेश्वराची नावे! धर्माचा तुलनात्मक अभ्यास केला की हे कळून चुकते. रिकी पॉंटिंग, इंजमाम उल हक किंवा सचिन तेंडुलकर शतक झाले की बॅट उंचावून वरती आकाशाकडे बघून कृतज्ञ व्हायचे. दिशा एकच! ” इतक्या सुंदर सहज शब्दात धर्माविषयी त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
मॉलीवूड, नानांना सॅल्यूट, वेश्या व्यवसायात अडकलेली आई आणि बारावीला 82 टक्के मार्क घेऊन आयपीएस बनवण्याचे स्वप्न बघणारे निकिता, तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढाकार येणारे मुजफ्फर नावाचे गृहस्थ, कोरोना काळात स्वातंत्र्यदिनी रक्तदान शिबिरामध्ये रक्त घ्या म्हणणारा अंडरवेट असणारा हट्टी तरुण, असे एक ना अनेक पात्रे आपल्याला मालेगाव सारख्या संवेदनशील शहरात लेखक भेटीला आणतात व त्यातून एक सामाजिक संदेश देऊ पाहतात जो आजच्या काळामध्ये खूपच आवश्यक झाला आहे.
भारतीय संस्कृतीत दान करण्याला खूप महत्त्व आहे. जसे रक्तदान, जीवदान, अन्नदान, धनदान, कन्यादान, नेत्रदान, ज्ञानदान इत्यादी परंतु धर्मराजाने यशाला दिलेले जगातील सर्वश्रेष्ठ दानाचे उत्तर म्हणजेच “अभयदान”! ईश्वराने, नियतीने, संविधानाच्या रूपात पोलिसांच्या खांद्यावर दिलेली मोठी जबाबदारी, अभयदान देण्याची! रात्री अपरात्री एकटे असताना मनाने भीतीचा ठाव घेत असतानाच पोलीस दिसावा आणि मग भीती गळून जाऊन सुरक्षितेची भावना निर्माण होईल हेच असते अभयदान! यावेळी सामान्य माणसाला पोलीस असल्याने सुरक्षित वाटते आणि तेच दुष्कृत्य करणाऱ्याला भीती!
पोलिसांच्या जीवनात वारंवार येणारी आणि अटळ असणारी गोष्ट म्हणजे जेवणाची वेळ. जीवन आणि जेवण हे दोन्ही शब्द एकमेकांशी पूरक असे आहेत. म्हणूनच लेखक म्हणतात की, “आमच्या जेवणापेक्षा कोणाचे तरी जीवन महत्त्वाचे असते.” पैशासाठी किडनॅप करणाऱ्या गुन्हेगाराला शिताफीने ताब्यात घेण्यासाठी राबवलेले ऑपरेशन हृदयाचा ठोका चुकवते. गोंदिया तसेच गडचिरोली जिल्ह्यातील अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त गावासाठी आवाक्याच्या बाहेर जाऊन जनतेसाठी केलेली कामे पाहिली की, आपोआपच वाचकाचा उर भरून येतो. आपणही असेच सत्कार्य करायला हवे अशी भावना मनी निर्माण होते आणि मला वाटते हेच लेखकाचे यश आहे. आणि हे यश त्यांनी प्रत्यक्ष केलेल्या कार्यातून मिळवलेले आहे. “आधी केले मग सांगितले” ही उक्ती येथे खरी ठरते.
दारू हे समाजाला लागलेले एक ग्रहण जे अद्याप पर्यंत संपलेले नाही. पोलीस खात्यात काम करत असताना प्रत्येक जण आपापल्या परीने हे ग्रहण संपवण्याचा प्रयत्न करतो पण तू ते काही केल्या संपत नाही. अधिकारी आहे तोपर्यंत त्याच्यावर वचक निर्माण होते आणि थोडे दुर्लक्ष झाले की परत त्याचे साम्राज्य पसरते जसा सूर्य मावळला की काळोख त्याचे साम्राज्य निर्माण करत असतो. सतत दारू पिणारा मरकाम मेजर ते “दारू पिऊन येणाऱ्या घरात प्रवेश नाही” असा नखशिकांत बदललेला मरकाम मेजर! स्व- परिवर्तनातून विश्व परिवर्तनाची कास धरणारी अशी अनेक पात्रे या पुस्तकात आपल्याला वेळोवेळी भेटतात आणि नकळत प्रेरणा देऊन जातात.
खरंतर माझ्या मते विद्यार्थ्यांना त्यांच्या दिशेत दशेत नावडणारी गोष्ट म्हणजे अभ्यास. परंतु त्याला इतर काहीही पर्याय नसल्याने अभ्यास हा करावाच लागतो. तोच अभ्यास पुढे जीवनाला आकार देत असतो. भरनोली सारख्या अतिदुर्गम नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील गावात लेखक त्यांच्या पोस्टिंग दरम्यान पडक्या इमारतीला सुसज्य करून अभ्यासिका उभी करतात आणि त्या अभ्यासिकेत अभ्यास करून पहिला आदिवासी मुलगा संदीप ताराम फौजदार म्हणून सिलेक्ट होऊन दीपस्तंभ निर्माण करतो. या गोष्टी करण्यासाठी खूप दुर्दम्य इच्छाशक्ती लागते, ती लेखकाजवळ काम करताना आपल्याला पदोपदी जाणवते. पिपरखारी हे गोंदिया जिल्ह्याच्या नकाशावर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर असणारे नक्षलग्रस्त गाव जेथे लेखक पोस्टिंग दरम्यान स्वतः व इतर प्रशासकीय विभागांच्या मदतीने गावाचा चेहरा मोहरा बदलून टाकतो व तेथील नागरिकांना जीवनाचा सुकर मार्ग दाखवतो.
मोक्का आणि साधलेली संधी म्हणजेच मोका यांचा सांधलेला अनोखा संगम आणि केलेली कारवाई ज्यामुळे अट्टल गुन्हेगार गजाआड झाला व सर्वसामान्य नागरिकांचा जीव भांड्यात पडला. साताऱ्यातील निसर्गरम्य ठिकाणे त्याचे वर्णन आणि त्याला साजेशी केलेली डॉल्बी बंदी! डॉन को पकडना मुश्किल ही नही नामुमकीन है असे वाटणारा डॉन अखेरीस चड्डीवर अनवाणी फिरताना दिसतो तो फक्त पराकोटीच्या कर्तव्य सजगतेमुळे!
इंडिया पासून कोसो दूर असलेल्या अति दुर्गम भागातील नागरिकांना घर मिळवून देणे, बंदुकी ऐवजी पुस्तक हातात देणे, व्यसनमुक्तता करणे, खतरनाक गुन्हेगारांना त्यांची जागा दाखवणे, जीवन जगण्याची हिम्मत देणे आणि सर्वात महत्त्वाचे जनतेला सुरक्षेचे अभयदान देणे हेच आहेत खांद्यावरचे स्टार्स… जे मुखपृष्ठावरील खाकी वर्दी आणि पांढरा शुभ्र पक्षी म्हणजेच निष्कलंक खाकी वर्दीवरती त्यांच्या वैचारिक व प्रामाणिक कार्यकर्तृत्वाने लावतात चार चाँद!
जय हिंद!
✍️ महेश लांडगे
पोलीस निरीक्षक, परभणी
मो. क्र. 9822417500

पुस्तकाचे नाव :- खांद्यावरचे स्टार्स
लेखक :- गजानन शिवलिंग राजमाने
प्रकाशन :- पॉप्युलर प्रकाशन, मुंबई
स्वागत मूल्य :- ₹ 300/-
पृष्ठे :- 122
