13 नगराध्यक्षासह 265 नगरसेवकांचा फैसला
नांदेड(प्रतिनिधी)-प्रदीर्घकाळापासून निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. न्यायालयाच्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेतील नगर परिषदा आणि नगर पंचायत यांच्या निवडणूकीचा मार्ग मोकळा झाला आणि दोन टप्यात मतदान प्रक्रिया पार पडली. उद्या दि.21 रोज रविवारी जिल्ह्यातील 12 नगर परिषद आणि एक नगर पंचायतीचा निकाल दुपारी 1 वाजेपर्यंत हाती येणार. यात तब्बल 83 उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी नशिब आजमावत आहेत. तर 1055 उमेवारी नगरसेवक पदासाठी नशिब आजमावत आहेत याचा आज अंतिम फैसला आहे.
राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला. सुरूवातीला सर्वच नगर परिषद आणि नगर पंचायतींची 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया आणि 3 डिसेंबरला निकाल असा निवडणुक विभागाने कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र मतदानाच्या काही तासांच्या अगोदर न्यायालयाने यात हस्तक्षेप करत राज्यातील काही निवडणुका लांबणीवर टाकल्या. यात नांदेडमध्ये धर्माबाद आणि मुखेड नगर परिषदेचे नगराध्यक्षासह सर्वच उमेदवार तर लोहा, कुंडलवाडी आणि भोकर या ठिकाणच्या एका जागेसाठी शनिवार दि.20 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. या सर्वांचा निकाल 21 डिसेंबर रोजी घोषित केला जाणार आहे. यात भोकर, उमरी, हदगाव, किनवट, हिमायतनगर, लोहा, कंधार, देगलूर, बिलोली, कुंडलवाडी, मुदखेड, धर्माबाद आणि मुखेड अशा 12 नगर परिषदे आणि 1 नगर पंचायत या निवडणुकीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. यात एकूण 13 नगराध्यक्ष पदासाठी 83 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर 265 नगरसेवकांसाठी 1 हजार 55 उमेदवार आपल नशिब आजमावत आहेत. 2 डिसेंबर रोजी 11 नगर परिषदेसाठी झालेल्या मतदानाची सरासरी 75 टक्केच्या जवळपास मतदान झाल्याची नोंद होती. तर धर्माबाद आणि मुखेड नगर परिषदेसाठी अंतिम आकडा प्राप्त झाला नसला तरी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत तरी 55 टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आली. या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या भवितव्याचा फैसला दि.21 रोज रविवारी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणीच्या माध्यमातून होणार आहे. आता या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
धर्माबाद येथे मतदारांना डांबून ठेवल्याच्या प्रकरणावरून काही वेळ तणाव निर्माण झाला होता. तर हा तणाव निवळला की, लगेच बोगस मतदारांवरून महिला मतदारात चांगलाच राडा झाला. यावेळी पोलीसांनाही जमाव पांगविण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करावा लागल्याची घटना घडल्याचे चित्रही प्रसार माध्यमांवर पाहावयास मिळाले. एकंदरीतच धर्माबाद नगर परिषदेसाठी तणावग्रस्त वातावरणात निवडणुक प्रक्रिया पार पडली असून जमाव बंदी आणि आचार संहितेचा भंग केल्या प्रकरणी इनानी मंगल कार्यालयाच्या मालकाविरुध्द रितसर फौजदार कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी सौ.सुरेखा स्वामी यांनी दिली असली तरी अद्यापही पोलीस दप्तरी कोणत्याही प्रकारची नोंद झाली नसल्याची माहिती सायंकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झाली.
