कायदा हातात, पण हात चोराचा! रेल्वे पोलिसाची कोठडी वाढली
नांदेड (प्रतिनिधी)-रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशाची तब्बल 14 लाख 100 रुपयांचा ऐवज असलेली बॅग चोरीला गेल्याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली असून या गुन्ह्यातील एक आरोपी स्वतः रेल्वे पोलिस असल्याचे उघड झाले आहे. सदर प्रकरणातील आरोपी पोलीस कर्मचाऱ्याची पोलीस कोठडी न्यायालयाने दुसऱ्यांदा वाढवत 22 डिसेंबर 2025 पर्यंत मंजूर केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, 7 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर–नागपूर रेल्वे प्रवासादरम्यान गणेश राठी यांच्या पत्नीची बॅग पूर्णा रेल्वे स्थानकावर चोरीला गेली होती. या बॅगेत 14 लाख 100 रुपयांचा मौल्यवान ऐवज होता. या घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
तपासादरम्यान पोलिसांनी पहिला आरोपी बाळू गणपत गव्हाणे याला अटक केली. त्याच्याकडून 7 लाख 52 हजार 984 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. मात्र या चोरीत आणखी एक आरोपी सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आणि तो आरोपी चक्क रेल्वे पोलीस असल्याचे उघडकीस आले.
या प्रकरणातील दुसरा आरोपी अक्षय जितेंद्र मोरचुले (बक्कल क्रमांक 441) हा नांदेड रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. त्याला अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी न्यायालयात अर्ज करण्यात आला होता, मात्र तो फेटाळण्यात आला. त्यानंतर 16 डिसेंबर रोजी त्याला अटक करण्यात आली. 17 ते 19 डिसेंबर दरम्यान त्याला न्यायालयाच्या आदेशाने पोलीस कोठडीत ठेवण्यात आले.
दरम्यान, चोरीतील सुमारे सात लाख रुपयांचा ऐवज अद्याप जप्त करणे बाकी असून, पोलीस कोठडी दरम्यान आरोपीने कोणतीही रक्कम किंवा माहिती दिली नाही. त्यामुळे आज पोलीस कोठडी संपल्यानंतर आरोपी अक्षय जितेंद्र मोरचुले याला प्रथमवर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले.या वेळी रेल्वे पोलिसांनी चोरीचा ऐवज अद्याप जप्त करायचा असल्याचे कारण पुढे करत पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली. जप्ती प्रलंबित असल्याचे लक्षात घेऊन न्यायालयाने आरोपी पोलिसाची पोलीस कोठडी दुसऱ्यांदा वाढवण्याचे आदेश दिले आहेत.आता पोलीस असलेल्या आरोपी अक्षय जितेंद्र मोरचुले याला 22 डिसेंबर 2025 पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात येणार आहे. या घटनेमुळे रेल्वे पोलिस दलात खळबळ उडाली असून प्रकरणाची चौकशी अधिक तीव्र करण्यात आली आहे.
संबंधित बातमी ..
14 लाखांच्या चोरी प्रकरणात रेल्वे पोलीसाला दोन दिवसाची पोलीस कोठडी
