जीवनात काही व्यक्ती भेटतात, आणि त्यांच्या भेटीचा अर्थ आपण नंतर समजतो. त्या क्षणी ती फक्त एक ओळख असते, पण काळ जसजसा पुढे जातो, तसं लक्षात येतं, की त्या व्यक्तीने आपलं आयुष्यच बदलून टाकलं आहे. माझ्यासाठी ती व्यक्ती म्हणजे, पांडे टीचर. मी गुजराती हायस्कूलचा विद्यार्थी. त्या शाळेच्या अंगणात उभं राहून वर्गात जाणं म्हणजे रोजचा उत्सवच असायचा बालपणीच्या त्या दिवसांत शिक्षक म्हणजे आमच्यासाठी सगळं काही मार्गदर्शक, शिस्त लावणारे, आणि कधी आईसारखी काळजी घेणारे, पण माझ्या आयुष्यात एक दिवस असाच आला ज्यादिवशी वर्गात एक नवी शिक्षिका आल्या.
तरुण वयातल्या त्या स्त्रीने गुलाबी साडी नेसलेली, चेहऱ्यावर शांत पण तेजस्वी हास्य, डोळ्यांत भविष्याचं दर्शन, आणि मनात प्रचंड धैर्य. त्या दिवशी मी त्यांच्याकडे पाहिलं आणि मनात विचार आला “ही साधीशी, हसरी शिक्षिका एवढं काय वेगळं शिकवू शकेल?” पण वर्ष उलटायच्या आत मला उमगलं की त्या फक्त शिकवायला आल्या नव्हत्या, त्या घडवायला आल्या होत्या.
त्या होत्या पांडे टीचर. त्या वेळी मी वर्गातील सर्वात खोडकर विद्यार्थी. शाळेच्या फळ्यावर चॉक उडवणं, बाकाखालून गप्पा मारणं, आणि कधी कधी शिक्षकांना चिडवणं – हे माझं आवडतं काम. पण एका दिवशी, सगळ्या वर्गासमोर त्यांनी माझं नाव घेतलं आणि म्हणाल्या, “आजपासून तू वर्गाचा मॉनिटर आहेस.” सगळे हसले. कारण तो मी होतो! पण त्यांच्या डोळ्यांत ना चेष्टा होती, ना राग फक्त विश्वास. त्या नजरेनं जणू सांगितलं, “मला माहित आहे, तू हे करू शकतोस.” त्या क्षणी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा कुणीतरी माझ्यावर अंधविश्वासाने विश्वास ठेवला. त्या दिवशी मला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकलं. त्या काळात वर्ग मॉनिटर असणं म्हणजे अभिमान. पण त्या अभिमानामागे जबाबदारी होती आणि ती मला त्यांनीच शिकवली. मला अजूनही आठवतं दुपारच्या सुट्टीत वर्गात गोंधळ माजायचा, सगळे ओरडायचे, हसायचे. आणि त्या वर्गात प्रवेश करत म्हणायच्या “एक… दोन… तीन…” आणि क्षणात वर्ग शांत व्हायचा. त्या तीन आकड्यांत लपलेला होता भीतीने नाही, विश्वासाने मिळते. आयुष्याचा मोठा धडा की शिस्त
आज मी जेव्हा माझ्या टीमसोबत देशभर काम करतो, तेव्हा त्या “एक-दोन-तीन”चा जादू आजही काम करतो. ती शिकवण आजही माझ्या नेतृत्वाचा पाया आहे. आज १८ वर्षानी आमचा school reunion होत आहे. वर्गात पुन्हा तेच चेहरे, तेच बाक, तीच घंटा… आणि मनात तोच आवाज “एक… दोन… तीन…” त्या काळी आम्ही त्यांना फक्त “पांडे टीचर” म्हणून ओळखायचो. अनेक वर्षांनी समजलं की त्यांचं पूर्ण नाव आहे शकुंतला पांडे. पण माझ्यासाठी त्या आजही फक्त “पांडे टीचर” आहेत एक तरुण मुलगी, जीने साडी नेसली होती पण अंगात सिंहासारखं धैर्य होतं, डोळ्यांत दृष्टी, मनात कृपा, आणि मेंदूत ज्ञानाचं सामर्थ्य. त्या माझ्या दृष्टीने शिक्षक नव्हत्या – त्या माझ्या आयुष्याची दुसरी आई होत्या. मी त्यांच्याकडून जन्म घेतला नाही, पण त्यांनी मला घडवलं जगात आत्मविश्वासाने उभं राहण्याचं बळ दिलं. कधी कधी विचार करतो त्यांच्या त्या छोट्या कृतींनी, छोट्या शब्दांनी, किती आयुष्यं बदलली असतील! किती मुलांनी स्वतःवर विश्वास ठेवायला शिकलं असेल!
मला आजही त्या प्रत्येक क्षणासाठी, त्या प्रत्येक शब्दासाठी कृतज्ञतेची भावना मनात आहे. त्या मला पुन्हा भेटल्या नाहीत पण त्यांच्या शिकवणी दररोज माझ्या सोबत असते माझ्या निर्णयांमध्ये, माझ्या विचारांमध्ये, माझ्या यशात.
लोक म्हणतात, जेव्हा मनुष्य मरणाच्या उंबरठ्यावर येतो, तेव्हा मेंदू बंद होण्याआधीच्या शेवटच्या सात मिनिटांत आपल्या संपूर्ण आयुष्याचा चित्रपट डोळ्यांसमोर झळकतो. आणि मी जेव्हा त्या क्षणी माझं आयुष्य पुन्हा बघेन, तेव्हा त्या चित्रपटातली एक प्रमुख व्यक्ति असेल – पांडे टीचर. कारण त्यांनी मला फक्त शिकवलं नाही, तर मी कोण आहे हे ओळखायला शिकवलं.
धन्यवाद, पांडे टीचर. तुमच्या ही प्रत्येक शिकवणीसाठी, प्रत्येक विश्वासासाठी, आणि त्या अमर मायेच्या स्पर्शासाठी मी सदैव ऋणी आहे. तुमचं नाव, तुमचा आवाज, आणि तुमचं शिकवणं माझ्या आयुष्याच्या शेवटच्या दृश्यातही झळकत राहील माझ्या चित्रपटात, मुख्य भूमिकेत – पांडे टीचर.
मनःपूर्वक आदर आणि कृतज्ञतेसह,
लेखक- तमेन्द्र सिंघ शाहू
