लोहा (प्रतिनिधी)-बेरळी (ता. लोहा) येथील साऊंड सिस्टिमच्या दुकानात ऑगस्ट महिन्यात झालेल्या चोरीचा गुन्हा केवळ उघडकीसच आला नाही, तर पोलिसांनी चोरटेही पकडले आहेत. लोहा पोलिसांनी तीन चोरट्यांना अटक करून त्यांच्या ताब्यातून ₹1 लाख 90 हजारांचा चोरीचा साउंड सिस्टिम माल आणि ₹4 लाख 50 हजारांची चारचाकी गाडी असा एकूण ₹6 लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 27 ऑगस्ट दुपारी 2 ते 30 ऑगस्ट दुपारी 3 वाजेदरम्यान बेरळी येथील दीपक होळगे यांच्या दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन टॉप साउंड बॉक्स (किंमत ₹1.90 लाख) चोरून नेले होते. या प्रकरणी गुन्हा क्रमांक 274/2025 लोहा पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आला होता.
घटनेच्या गांभीर्याची दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने, पोलीस उपनिरीक्षक एम. जी. सोनकांबळे, तसेच पोलिस अंमलदार नारायण कदम, रवी मडके आणि घोरबांड यांनी तपासाला गती दिली.
तपासादरम्यान अहमदपूर येथून सुरज रावसाहेब कांबळे (वय 32), विजय मोहन येवते (वय 23) आणि अर्धापूर येथील जनार्दन मनोहर भगत (वय 22) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या चौकशीत उघड झाले की या चोरीत एकूण पाच जणांचा सहभाग होता.
पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून ₹1.90 लाखांचा साउंड सिस्टिमचा माल आणि चोरीसाठी वापरलेली ₹4.50 लाख किंमतीची चारचाकी गाडी जप्त केली आहे. या कारवाईमुळे पोलिसांनी केवळ चोरी उघडकीस आणली नाही तर स्थानिक गुन्हेगारीला मोठा आळा बसला आहे.लोहा पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
