नांदेड(प्रतिनिधी)-सर्वसाधारणपणे पोलीस विभागात उत्कृष्ट तपास (बेस्ट डिटेक्शन) या कामासाठी सन्मान केला जात असतो. परंतू 18 सप्टेंबर रोजी झालेल्या गुन्हे परिषदेमध्ये उमरी पोलीस ठाण्यातील ऑनर किलींग प्रकारात काम करणाऱ्या सहाय्यक पोलीस निरिक्षकासह पोलीस अंमलदारांना बेस्ट डिटेक्शन हा सन्मान कसा दिला याची चर्चाच पोलीस दलात वेगवेगळ्या शब्दात सुरू आहे.
दि.25 ऑगस्ट रोजी संजीवनी कमळे उर्फ सुरणे आणि लखन बालाजी भंडारे यांना सोबत घेवून संजीवनीचे वडील मारोती लक्ष्मण सुरणे हे बोरजुन्नी गावाकडे येत होते. त्यांनी लखन बालाजी भंडारे याला सुध्दा गोळेगाव येथून बोरजुन्नीकडे सोबत आणले. या संदर्भाने दि.25 आणि 26 ऑगस्ट रोजी वास्तव न्युज लाईव्हने बातम्यांना प्रसिध्दी दिली होती. त्यामध्ये लखन भंडारे हा युवक अनुसूचित जातीचा आहे आणि त्याचे प्रेत संजीवनी कमळे उर्फ सुरणे हिच्या सोबत होते. या दोघांना गोळेगाव येथे संजीवनीच्या सासरच्या मंडळींनी एकत्र पाहिले आणि त्यांनी संजीवनीचे वडील मारोती सुरणे यांना बोलावून घेतले. ते आपले बंधू माधव आणि वडील लक्ष्म यांच्यासोबत गोळेगावला आले आणि लखन भंडारे आणि संजीवनीला घेवून बोरजुन्नी गावाकडे जात असतांना करकाळा शिवारात संजीवनी आणि लखन यांचा खून करून विहिरीत फेकून दिले.
म्हणजे या घटनेत 24 ऑगस्ट रोजी गोळेगाव येथे सर्वांना माहिती झाली असणार मग त्या गावच्या पोलीस पाटलाने आपल्या संबंधीत पोलीस ठाण्यात ही माहिती का दिली नाही. सुरणे कुटूंबियांनी प्रियकर आणि प्रियसीला पायीच आणले होते. मग ती घटना सुध्दा अनेकांनी पाहिली असणार. खून केल्यानंतर मारोती सुरणे हे स्वत: पोलीस ठाणे उमरी येथे हजर झाले आणि आपण दोन खून केल्याचे सांगितले. या प्रकरणात असे काय शिल्लक राहिले जे पोलीसांना शोधायचे होते. सर्व माहिती मारेाती सुरणे यांनी पोलीसांना दिलीच होती. मग हा गुन्हा क्रमांक 280/2025 बेस्ट डिटेक्शनमध्ये कसा आला याची चर्चा करत असतांना पोलीस दलातच बोलले जात आहे की, वाढपी जेंव्हा आपला असतो तेंव्हा आपल्या ताटात येणारे जेवण हे उत्कृष्टच असते. असाच काहीसा प्रकार हा बेस्ट डिटेक्शन सन्मान देण्यात झाला आहे. यात उमरीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक अंकुश माने यांच्यासह पाच पोलीस अंमलदारांना सन्मानपत्र देण्यात आले आहे.
संबंधित बातमी…
