अबब .. असे बोलले गडकरी जो लोकांना मूर्ख बनवतो तो मोठा नेता’ : गडकरींचा अप्रत्यक्ष वार मोदी-शहांवर?

सात दिवसांनंतर उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या खासदारांमध्ये लपलेला असंतोष उफाळून येत आहे. अशातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये एका कार्यक्रमात केलेले वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे.गडकरी म्हणाले, “जो व्यक्ती लोकांना सर्वात चांगल्या प्रकारे मूर्ख बनवू शकतो, तोच सर्वात मोठा नेता असतो.” त्यांनी कुणाचे नाव घेतले नसले तरी, हे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावरच असल्याचे विश्लेषण अनेकांकडून केले जात आहे. उपस्थितांनाही संदर्भ लगेच समजला, असे सांगितले जात आहे.

मोदी आणि गडकरी यांच्यातील मतभेद आधीही अनेकदा दिसून आले आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत चर्चा करण्यासाठी नरेंद्र मोदी लोकसभेत आले होते, तेव्हा बहुतेकांनी त्यांचे स्वागत केले, परंतु गडकरी यांनी हात जोडले नाहीत. उलट, त्यांनी आपले हात मागे घेतल्याचे पाहायला मिळाले.गडकरी यांनी हे पहिल्यांदाच बोललेले नाही. त्यांनी अनेक वेळा गुजरात लॉबीवर टीका केली आहे. त्यांच्या मते, “मनापासून खरं बोलणं आजच्या राजकारणात मान्य नाही. धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्या नेत्यांना आणि मंत्र्यांना दूर ठेवायला हवे. सत्तेच्या हातात धर्म देणे हे अतिशय घातक आहे. राजकीय व्यक्ती जिथे जातात, तिथे ते आग लावल्याशिवाय राहत नाहीत.”

गडकरींच्या या विधानांचे लक्ष्य कोण आहे, याचा अंदाज अनेकांनी लावला आहे. नामोल्लेख न करताही त्यांनी मोदी-शहा यांच्यावर निशाणा साधल्याचे स्पष्टपणे दिसते. उपराष्ट्रपती निवडणुकीआधीच गडकरी का बोलले, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. काही भाजप खासदारांचा दावा आहे की, त्यांच्या बोलण्याने अमित शहा चिडले असून, ती चीड त्यांच्या मस्तकापर्यंत पोहोचली आहे.भाजपचे काही सदस्य असेही म्हणतात की, गडकरी यांच्या बोलण्याची वेळ चुकीची आहे. आज पक्षात एकजूट गरजेची असताना, असे वक्तव्य पक्षाबाहेर चुकीचा संदेश देत आहे. मात्र गडकरी असे का बोलले, हे तेच सांगू शकतील. त्यांच्या जवळच्या काही व्यक्तींच्या म्हणण्यानुसार, मागील काही दिवसांपासून गडकरी नाराज आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना, विशेषतः त्यांच्या मुलांना, उद्देशून टार्गेट करण्यात येत आहे. विशेषतः गुजरात लॉबीशी जवळीक असलेल्या पत्रकारांकडून हे सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

त्याच पत्रकारांनी गडकरी कुटुंबीयांवर आर्थिक गैरप्रकारांचे आरोप करत हल्ले सुरू केले आहेत. गडकरींनी प्रत्यक्ष कोणाचे नाव घेतलेले नसले, तरी त्यांच्या बोलण्यामधून इशारा स्पष्ट आहे.या पार्श्वभूमीवर, भाजपमध्ये एक असंतुष्ट गट तयार झाला आहे, अशी शंका अमित शहा यांना वाटत आहे. त्यांना भीती वाटते की, उपराष्ट्रपती निवडणुकीत हे असंतुष्ट खासदार क्रॉस वोटिंग करू शकतात.

 

यासंदर्भात एक अलीकडील घटना महत्त्वाची ठरते. ‘कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया’च्या निवडणुकीत भाजपचेच खासदार राजीव प्रताप रूडी यांनी अमित शहा समर्थित संजीव बालियान यांचा पराभव केला. यावरून पक्षांतर्गत नाराजी आणि क्रॉस वोटिंगचे स्पष्ट संकेत मिळतात.अमित शहा यांना असेही वाटत आहे की, नाराज खासदार नितीन गडकरी, शिवराज सिंह चौहान, राजनाथ सिंह, योगी आदित्यनाथ, येडियुरप्पा आणि वसुंधरा राजे यांच्यासोबत जवळीक साधत आहेत. भाजपला 2024 लोकसभा निवडणुकीत 240 जागा मिळाल्यानंतर ही नाराजी अधिक तीव्र झाली आहे.

 

नाराजीचं आणखी एक कारण म्हणजे नितीन गडकरींच्या मुलांच्या इथेनॉल प्रकल्पांवर करण्यात आलेले आरोप. पत्रकार प्रकाश पोहरे विचारतात की, अश्विनी वैष्णव यांचे सर्वाधिक इथेनॉल प्रकल्प असतानाही केवळ गडकरींचेच टार्गेट का?2013-14 मध्येही नितीन गडकरी भाजप अध्यक्ष होण्याच्या मार्गावर होते, पण त्यावेळीही त्यांच्या ‘पूर्ती’ कंपनीवर आरोप करून त्यांना अडवलं गेलं. त्यावेळी संघाने त्यांना पुन्हा अध्यक्ष करून भविष्यात पंतप्रधान बनवण्याचा विचार केला होता. त्यामुळेच, आजही तसाच कांगावा पुन्हा सुरु झाला आहे, असे प्रकाश पोहरे म्हणतात.

 

पत्रकार विवेक देशपांडे यांचे म्हणणे आहे की, संघ आजही गडकरींना भाजप अध्यक्ष किंवा पंतप्रधान म्हणून पाहू इच्छितो. ही बाब गुजरात लॉबीच्या लक्षात आली आहे, म्हणूनच त्यांनी माध्यमांतून गडकरींवर हल्ले सुरू केले आहेत.मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्याही पार्श्वभूमीवर संघाशी जोडलेले काही कार्यकर्ते म्हणत आहेत की, “आम्ही कोणतेच काम करणार नाही, आणि आम्हाला कोणतेच काम देऊ नका.” हे भाजपसाठी अत्यंत गंभीर लक्षण आहे.

उपराष्ट्रपती निवडणुकीत दोन्ही बाजूंमध्ये केवळ 62 मतांचे अंतर आहे. जर ही 62 मते क्रॉस वोटिंगने पलिकडे गेली, तर भाजपसाठी मोठा धक्का असू शकतो.गडकरींचे विधान, “बाभळीची झाडं लावून आंबे मिळत नाहीत,” हे सध्याच्या भाजप नेतृत्वावर केलेले भाष्य आहे. ज्यांना त्रास दिला जात आहे, त्यांच्यासाठी ही निवडणूक एक संधी आहे. आणि जर त्यांनी ही संधी साधली नाही, तर अशी संधी पुन्हा कधी मिळेल, याची खात्री नाही.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!