नांदेड(प्रतिनिधी)–जिल्ह्यात बर्याच ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. नांदेड शहरात या पावसामुळे हाहाकार उडाला असून अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने संसार उघड्यावर आले आहेत. अशा पूरग्रस्तांना तात्काळ मदत द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते बंटीभाऊ लांडगे यांनी केली आहे.
दोन दिवसापुर्वी झालेल्या पावसामुळे शहरासह जिल्ह्यात दानादान उडाली आहे. अनेक गाव व शहरातील वस्त्यांना पाण्याचा वेढा असल्यामुळे रेस्क्यू करत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. नांदेड शहरातील देगावचाळ, भीमघाट, नलागुटा चाळ, भैयासाहेब आंबेडकर नगर, गंगाचाळ, पक्कीचाळ, खडकपुरा, पंचशिल नग, सैलाबनगर टेकडी, समीरा बाग या भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे नागरिकांचा संसार उघड्यावर आला आहे. प्रशासनाकडून निवारा केंद्रात तात्पुरता निवारा देण्यात आला आहे. परंतू घरात पाणी गेल्यामुळे संसार उपयोगी साहित्य व जिवनावश्यक वस्तूंची मोठ्या प्रमाणात नासधूस झाली आहे. अशा संकटात सरकारने पूरग्रस्तांना मदत करणे गरजेचे झाले आहे. महापालिका प्रशासनाने या भागातील पूरग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत करून धीर द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते बंटीभाऊ लांडगे यांनी केली आहे.
