राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत ह्रदय शस्त्रक्रियेसाठी 18 बालके मुंबईकडे रवाना

 

नांदेड : श्री गुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयातून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली हृदयाचे आजार असलेल्या सदृश्य बालकांची 2 डी इको तपासणी शिबिर 16 जुलै रोजी घेण्यात आले होते. या शिबिरामधून 18 हृदय शस्त्रक्रियेसाठी पात्र झालेल्या बालकांना राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत मुंबई येथे आज रवाना करण्यात आले.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पांडुरंग पावडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ राजाभाऊ बुट्टे यांच्या नेतृत्त्वाखाली या बालकांना तपासणी करण्यात आली होती. सदरील कार्यक्रमांतर्गत मागील वर्षीपासून 125 बालकांच्या ह्र्दय शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आलेल्या असून इतर आजाराच्या 634 शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत. एकूण 76 बालकांना श्रावण यंत्र उपलब्ध करून देण्यात आलेले आल्याने त्यांचा बहिरेपणा दूर झाला आहे. यामुळे राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत तपासणी करण्यात आलेल्या शाळा, अंगणवाडी मधील बालकांची आरोग्य तपासणी होऊन त्यांना असलेल्या आजारापासून मुक्त करण्यासाठी वेळीच औषधोपचार आणि गरजेनुसार शस्त्रक्रिया केल्या जात असल्याने पालक व शिक्षक यांच्याद्वारे समाधान व्यक्त होत आहे.

याकामी अनिल कांबळे आरबीएसके जिल्हा कार्यक्रम समन्वयक, विठ्ठल तावडे डीइआयसी व्यवस्थापक श्रीमती अनिता चव्हाण आणि गुनानंद सावंत तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत असलेले वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व डीइआयसी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!