नांदेड(प्रतिनिधी)-वडीलोपार्जित शेती अर्जदाराच्या सांगण्याप्रमाणे त्याच्या पत्नीच्या नावाने लावण्यासाठी 16 हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या दोन महिला तलाठ्यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर दुसऱ्या विशेष जिल्हा न्यायाधीशांनी त्यांना सध्या वास्तव्यासाठी तुरूंगात पाठवून दिले आहे.
दि.29 मे रोजी लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयात आलेल्या तक्रारीनुसार त्या तक्रारदाराकडे असलेल्या जमीनीतील काही हिस्सा पत्नीच्या नावाने करण्यासाठी मौजे पांगरा सज्जा सिंदगी येथील तलाठी भाग्यश्री भिमराव तेलंगे या लाच मागणी करीत होत्या. या संदर्भाने लाच मागणीची पडताळणी झाली आणि 3 जून रोजी तलाठ्यांच्या खाजगी कार्यालयात किनवट येथे तेलंगे यांची भेट घेतली असता तेंव्हा माझी बदली झाली आहे. तुमचे काम गवळे मॅडमकडे आहे असे सांगितले आणि त्यांना भेटायची सुचना केली. दोन्ही महिला तलाठ्यांनी आपासात चर्चा करून काय करायचे यावर चर्चा केली आणि काम करायचे नसेल तर फाईल देवून टाक असेही सांगितले. एकाच गोष्टीला दहावेळेस सांगायला आम्हाला वेळ नाही असा दम पण दिला. शेवटी 16 हजार रुपये घ्यायचे ठरले. ही सर्व पडताळणी वॉईस रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने भाग्यश्री भिमराव तेलंगे (34) सज्जा निचपुर ता.किनवट रा.हनुमानमंदिरसमोर गोकुंदा, किनवट तसेच सुजाता शंकर गवळे (25) तलाठी सज्जा कनकवाडी ता.किनवट रा.एकतानगर गोकुंदा यांना अटक केली. हा गुन्हा क्रमांक 169/2025 पोलीस ठाणे किनवट येथे दाखल झाला.
तपास अधिकारी पोलीस उपअधिक्षक प्रशांत पवार आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारांनी पकडलेल्या दोन्ही तलाठ्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले. जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड.रणजित देशमुख यांनी तपासाच्या प्रगतीसाठी दोन्ही महिला तलाठींची पोलीस कोठडी देणे आवश्यक असल्याचा मुद्दा न्यायालयात मांडला. नांदेडचे दुसरे अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी दोन्ही महिला तलाठ्यांना 5 जून 2025 पोलीस कोठडीत पाठविले होतेे.
आज लाच लुचपत प्रतिबंधक विभागानेच या दोन्ही महिला तलाठ्यांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्याचा अर्ज आणला होता. तांत्रिक सर्व बाबी तपासून न्यायालयाने आज तरी या दोन्ही महिला तलाठ्यांना जामीन दिला नाही. त्यामुळे सध्या त्यांचे वास्तव तुरूंगात झाले आहे. या प्रकरणात लाच स्विकारणाऱ्या महिला तलाठ्यांच्यावतीने दुसऱ्या पिढीतील नामांकित वकील ऍड. मनिष रामेश्र्वर शर्मा (खांडील) यांनी बाजू मांडली होती.
16 हजारांची लाच घेणाऱ्या दोन महिला तलाठी वास्तव्यासाठी तुरूंगात
